सर्वपक्षीय टीकेनंतर पवारांच्या निवासस्थानाची सुरक्षा कायम 

वृत्तसंस्था
Sunday, 26 January 2020

शरद पवार यांच्या "सहा जनपथ' या निवासस्थानी सुरक्षेसाठी असलेले पोलिस आणि निमलष्करी दलाचे जवान 20 जानेवारीपासून अनुपस्थित होते. याबाबतची कोणतीही माहिती पवार यांच्या कार्यालयाला देण्यात आली नव्हती, त्यामुळे सरकारनेच ही सुरक्षा काढून घेतल्याची चर्चा सुरू झाली होती.

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा केंद्र सरकारने काढून घेतल्याची बातमी प्रसृत होताच नव्या वादाला सुरुवात झाली होती. सर्वंच पक्षांनी सरकारच्या या कृत्याचा निषेध केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी आज सारवासारव करताना "सुरक्षाव्यवस्था कायम असल्याचा' खुलासा केला. पवार यांच्या निवासस्थानी बंदोबस्तासाठी पुरेसे पोलिस तैनात असल्याचेही दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शरद पवार यांच्या "सहा जनपथ' या निवासस्थानी सुरक्षेसाठी असलेले पोलिस आणि निमलष्करी दलाचे जवान 20 जानेवारीपासून अनुपस्थित होते. याबाबतची कोणतीही माहिती पवार यांच्या कार्यालयाला देण्यात आली नव्हती, त्यामुळे सरकारनेच ही सुरक्षा काढून घेतल्याची चर्चा सुरू झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती; तर शिवसेनेनेही केंद्र सरकारला लक्ष्य केले होते. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध केला होता. 

या पार्श्‍वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आज खुलासा करताना पवार यांच्या निवासस्थानाची सुरक्षा हटविण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले. दिल्ली पोलिसांचे कर्मचारी नियमानुसार तेथे बंदोबस्तासाठी तैनात आहेत, असेही सांगण्यात आले. दरम्यान, बंदोबस्ताची जबाबदारी असलेले पोलिस पवार यांच्या निवासस्थानी का पोचले नाहीत, याचीही चौकशी दिल्ली पोलिसांकडून केली जाणार असल्याचे समजते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Security not withdrawn from Sharad Pawars residence says Delhi Police