प्रजासत्ताक दिनानिमित्त कडेकोट सुरक्षा

वृत्तसंस्था
बुधवार, 25 जानेवारी 2017

संपूर्ण मध्य व नवी दिल्ली शहर भागामध्ये सुरक्षा दलांचे किमान 50 हजार जवान संरक्षणासाठी तैनात असणार आहेत. ड्रोन प्रतिबंधक तंत्रज्ञानासहच सुरक्षा दलांचे जवान आजुबाजुच्या उंच इमारतींवर विमानभेदी तोफांसह सज्ज असतील.

नवी दिल्ली - भारताची राजधानी असलेल्या दिल्ली शहरामध्ये उद्या (शुक्रवार) होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर येथे अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी काही मुस्लिम धर्मांध संघटना 9/11 सारखा हल्ला घडविण्याची योजना आखत असल्याचे गुप्तचर खात्याने म्हटले आहे. 

प्रजासत्ताक दिनी लष्कर-इ-तैयबासारख्या दहशतवादी संघटना चार्टर्ड हेलिकॉप्टर वा इतर हवाई माध्यमामधून दहशतवादी हल्ला घडविण्याचा इशारा गुप्तचर खात्याने दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर अशा स्वरुपाच्या कोणत्याही धोक्‍यास तोंड देण्यासाठी सुरक्षा दलांकडून ड्रोन प्रतिबंधक तंत्रज्ञानाचाही अवलंब करण्यात आला असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. 

संपूर्ण मध्य व नवी दिल्ली शहर भागामध्ये सुरक्षा दलांचे किमान 50 हजार जवान संरक्षणासाठी तैनात असणार आहेत. ड्रोन प्रतिबंधक तंत्रज्ञानासहच सुरक्षा दलांचे जवान आजुबाजुच्या उंच इमारतींवर विमानभेदी तोफांसह सज्ज असतील, असे सूत्रांनी म्हटले आहे. या संपूर्ण भागावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. दहशतवादी हे लष्कर वा पोलिसांच्या गणवेशामध्येही घुसू शकतात, असा इशारा गुप्तचर खात्याने दिला आहे.

Web Title: Security Tightened Up In Delhi Ahead Of Republic Day