सेहवागच्या पत्नीची फसवणूक; खोट्या सह्यांमुळे झाले 4.5 कोटींचे कर्ज

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 13 जुलै 2019

आरती सेहवाग यांनी रोहित कक्कर यांच्यासोबत व्यावसायिक भागीदारी केली होती. कक्कर यांच्यासोबत आणखी काही लोकांनी फसवणूक केल्याचा आरोपही आरती यांनी केला आहे.

नवी दिल्ली : भारताचा माजी तडाखेबंद फलंदाज आणि सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांची पत्नी आरती सेहवाग यांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. व्यावसायिक भागीदाराने खोट्या सह्या करून 4.5 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप वीरेंद्र सेहवाग यांच्या पत्नीने केला आहे. या फसवणूकीसंदर्भात आरती सेहवाग यांनी दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

आरती सेहवाग यांनी रोहित कक्कर यांच्यासोबत व्यावसायिक भागीदारी केली होती. कक्कर यांच्यासोबत आणखी काही लोकांनी फसवणूक केल्याचा आरोपही आरती यांनी केला आहे. कक्कर आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी वीरेंद्र सेहवाग आणि आरती सेहवाग हे आमचे व्यावसायिक भागीदार असल्याची माहिती एका बांधकाम क्षेत्रातील कंपनीला दिली होती. कक्कर हे दिल्लीतील अशोक विहार येथील रहिवासी आहेत. 

रोहित कक्कर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आरती सेहवाग यांना कोणतीही माहिती न देता संबंधित कंपनीकडून साडेचार कोटींचे कर्ज घेतले आहे. मात्र, मला कल्पना दिल्याशिवाय कोणतेही करार होणार नाहीत, याची माहिती कक्कर यांना अगोदरच दिली असल्याचे आरती यांनी सांगितले. त्यामुळे साडेचार कोटींच्या कर्जाबाबत कसलीही माहिती नसल्याचे आरती यांनी स्पष्ट केले.

हा करार मंजूर व्हावा यासाठी खोट्या सह्या करण्यात आल्याचा आरोप आरती यांनी केला आहे. फसवणुकीसंदर्भात आरती सेहवाग यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आरोपींविरोधात कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sehwags wife cheated 4 point 5 crores loan due to false signatures