शिवसेनेशी जरा दमानंच...; भाजप श्रेष्ठींचा राज्य नेतृत्वाला सल्ला

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने चालू आहे काय, हा सुरवातीला काहीसा अशक्‍य वाटणारा प्रश्‍न आता गंभीर होत चालला आहे.

नवी दिल्ली - महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने चालू आहे काय, हा सुरवातीला काहीसा अशक्‍य वाटणारा प्रश्‍न आता गंभीर होत चालला आहे. कदाचित काही काळासाठी ही स्थिती स्वीकारून त्यादरम्यान हा पेच सोडविण्यासाठी हालचाली करण्याच्या दिशेने राज्यातील राजकीय घडामोडी होत असल्याचे आजचे चित्र आहे. असे घडल्यास महाराष्ट्रातील ही एक अभूतपूर्व स्थिती असेल. 

दरम्यान, शिवसेनेबरोबर संबंध तोडण्याबाबत भाजपमधील काही वरिष्ठ नेत्यांनी वर्तमान नेतृत्वाला सबुरीचा सल्ला दिल्याची माहितीही भाजपच्या गोटातून मिळत आहे.

ज्या शिवसेनेबरोबर गेली तीस वर्षे आघाडी चालू आहे, त्यांच्याशी काडीमोड घेण्याबाबत विनाकारण घाई करू नये, असा सबुरीचा सल्ला भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी सध्याच्या भाजप नेतृत्वाला दिल्याचे समजते. एवढेच नव्हे, तर त्यांची मुख्यमंत्रिपदाबाबतची आग्रही मागणी फेटाळण्याऐवजी त्याबाबतही फेरविचार करण्याचा सल्ला या नेत्यांनी दिल्याचे समजले. महाराष्ट्राबाबतच्या हाताळणीबाबत या नेत्यांनी काहीशी नाराजीही व्यक्त केली.

काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत आले होते व त्यांनी काल पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती. फडणवीस यांनी निवडणुकीच्या निकालानंतर तातडीने वक्तव्ये करून पाच वर्षे तेच मुख्यमंत्री राहणार, कोणताही ‘फॉर्म्युला’ ठरलेला नाही, असे सांगून शिवसेनेच्या मागण्या धुडकावून लावण्याचा जो पवित्रा घेतला, त्याबद्दल भाजप पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज झाल्याचे समजते. पंतप्रधानांकडून त्यांना भेट न मिळणे, हा त्याचा एक संकेत मानला जातो. यामुळेच शहा यांनी त्यांना, ‘प्रथम शिवसेनेशी तुम्हीच संपर्क साधा आणि ही कोंडी फोडण्यास सुरवात करा,’ अशी सूचना दिल्याचे समजते. या घडामोडींनंतरच भाजपच्या स्वरात सौम्यता आल्याचे मानले जाते.

संरक्षणमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष राजनाथसिंह तसेच ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक मंडळाचे सदस्य मुरलीमनोहर जोशी यांच्यासारख्या नेत्यांनी शिवसेनेबरोबरचे राजकीय संबंध तडकाफडकी संपुष्टात आणण्याबाबत सबुरी बाळगावी, असा सल्ला भाजपच्या वर्तमान नेतृत्वद्वयास दिल्याची माहिती मिळते. 

निवडणूक कोणालाच नको!
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार व काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा, ही बाब अद्याप संकल्पनेच्या स्वरूपातच आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींना ही बाब अद्याप पचनी पडताना आढळत नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनाही ही कोंडी लवकर फुटण्याची इच्छा आहे. कारण, त्यानंतरच सर्वांना आपापल्या राजकीय भूमिका काय हे स्पष्ट होणार आहे आणि त्यानुसार कामाला सुरवात करता येईल, असे या दोन्ही पक्षांच्या आमदारांनी नेतृत्वाला सांगितले आहे. मात्र, राज्यातील आमदारांना कोणत्याही परिस्थितीत पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्याची इच्छा नाही, ही बाब स्पष्ट आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior BJP leaders give advice to state leadership