बेळगाव शहरात स्वतंत्र बस मार्ग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

बेळगाव - स्मार्ट सिटी योजनेतून आरटीओ सर्कल, कीर्ती हॉटेल, मार्केट पोलिस ठाणे ते सीबीटी या रस्त्यावर प्रायॉरिटी बस लेन म्हणजेच स्वतंत्र बस मार्गाची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी २१ कोटी रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे.

बेळगाव - स्मार्ट सिटी योजनेतून आरटीओ सर्कल, कीर्ती हॉटेल, मार्केट पोलिस ठाणे ते सीबीटी या रस्त्यावर प्रायॉरिटी बस लेन म्हणजेच स्वतंत्र बस मार्गाची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी २१ कोटी रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे. चन्नम्मानगर, काँग्रेस रोड, बॉक्‍साईट रोड, हनुमाननगर येथे सायकल ट्रॅक तयार केला जाणार आहे. त्यासाठी ४८ कोटी रूपये खर्चण्यात येणार आहेत.

या दोन्ही योजनांचा आराखडा तयार असून शहरातील सरकारी शाळांमध्ये स्मार्ट क्‍लासरूम्सची निर्मिती करण्याची सूचना राज्यशासनाने दिली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेतून स्मार्ट क्‍लासरूम्सचे कामही हाती घेतले जाणार आहे. यासाठीचा प्रकल्प आराखडा अद्याप तयार झालेला नाही. शाळांची यादी नगरसेवकांनी द्यावी, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक शशीधर कुरेर यांनी केले आहे.

स्मार्ट सिटी योजनेतून शहरात दोन ठिकाणी स्मार्ट रोड निर्मितीचे काम सुरू आहे. याशिवाय हेरीटेज पार्क, कमांड व कंट्रोल सेंटरचे बांधकाम, रस्त्याकडे पिण्याच्या पाण्याचे कियोस्क बसविणे, चार ठिकाणी स्मार्ट बस शेल्टर्स बांधणे ही कामे सुरू आहेत. शहरातील उद्यानांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग व कचरा विघटन करण्याच्या योजनेचा ठेका दिला आहे. मोकाट जनावरांच्या पुनर्वसनाचा ठेकाही दिला आहे. पथदीप एनर्जी ऑडिट अहवाल ठेकेदार कंपनीने स्मार्ट सिटी विभागाकडे सादर केला आहे.

कणबर्गी तलावाची सुधारणा, नाथ पै उद्यानात थीम पार्क, 
प्राथमिक आरोग्य केंद्रांची सुधारणा, सीबीटीची नवी इमारत बांधणे, शहरात आणखी तीन ठिकाणी स्मार्ट रोड्‌सची निर्मिती, खासगी वाहनांसाठी पार्कींग सुविधा या योजनांची निविदा प्रक्रिया झाली आहे. कला मंदीर येथे बहुउद्देशीय केंद्र निर्मितीचा प्रस्ताव तयार आहे. डुकरांचे पुनर्वसन, हॉकर्स झोन निर्मिती, परवडणारी घरे, कौशल्य विकास केंद्र, आर्ट गॅलरी, पर्यटक मार्गदर्शन केंद्रांची स्थापना, धर्मनाथ सर्कल येथे ट्रॉमा केअर सेंटरची निर्मिती या प्रकल्पांचा आराखडा लवकरच तयार होणार आहे.

योजनांची चाचपणी
धर्मनाथ सर्कल येथे बहुउद्देशीय केंद्राची निर्मिती, सोलार रूफटॉप पॅनलिंग, पवनऊर्जा, पब्लिक बाईक शेअर, एलईडी बल्ब बसविणे या योजना राबविता येतील का, याची चाचपणी स्मार्ट सिटी विभागाकडून सुरू आहे.

Web Title: separate bus routes in Belgaum city