यासिन मलिक, झाहीद अली पोलिसांच्या ताब्यात

गुरुवार, 7 मार्च 2019

सध्या पोलिसांनी काश्‍मीर खोऱ्यातील फुटीरवाद्यांच्या मुसक्‍या आवळायला सुरवात केली असून तीनशेपेक्षाही अधिक नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

श्रीनगर : "जम्मू-काश्‍मीर लिबरेशन फ्रंट'चा प्रमुख यासिन मलिक याच्याविरोधात जनसुरक्षा कायद्यान्वये (पीएसए) गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी त्याला जम्मूतील कोट बालवाल तुरूंगामध्ये ठेवले आहे. "जमाते इस्लामी'चा नेता आणि मुख्य प्रवक्‍ता झाहीद अली यालाही "पीएसए'अंतर्गत पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सध्या पोलिसांनी काश्‍मीर खोऱ्यातील फुटीरवाद्यांच्या मुसक्‍या आवळायला सुरवात केली असून तीनशेपेक्षाही अधिक नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. "जमाते इस्लामी'ला बेकायदा संघटना घोषित केल्यानंतर सुरक्षा दलांनी फुटीरवादी नेत्यांविरोधातील कारवाईला गती दिली आहे. यासिन याच्या अटकेनंतर काश्‍मीर खोऱ्यामध्ये पुन्हा एकदा आंदोलनाचा भडका उडाला असून आज शेकडो आंदोलकांनी रस्त्यावर उतरत निदर्शने केली. दरम्यान मलिकविरोधात "पीएसए'अंतर्गत कारवाई केल्याबद्दल हुर्रियतचे नेते मिरवाईज फारूख यांनी प्रशासनाचा निषेध केला आहे.