आज 10 सप्टेंबर; जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन, तरुणांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढतंय

मिलिंद तांबे
Thursday, 10 September 2020

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात 20 कोटी लोकांना प्रत्यक्ष मानसिक आरोग्याच्या सुविधांची आवश्यकता असून नैराश्यग्रस्त व्यक्ती असलेल्या देशात भारताचा सहावा क्रमांक लागतो.

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र या घडनेनं तरूणांमधील आत्महत्येच्या वाढत्या अधोरेखीत झाल्या आहेत. देशात दरवर्षी आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होत असून त्यात तरूणांचे प्रमाण अधिक असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात 20 कोटी लोकांना प्रत्यक्ष मानसिक आरोग्याच्या सुविधांची आवश्यकता असून नैराश्यग्रस्त व्यक्ती असलेल्या देशात भारताचा सहावा क्रमांक लागतो.

जागतिक आरोग्य संघटनेने 10 सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून जाहीर केला असून कोरोना संकटकाळात या दिनाला फार महत्व आले आहे. संसार नीट चालला नाही, परीक्षेत मार्क कमी मिळाले ,आर्थीक संकट आले या कारणांसोबतच आता आत्महत्यांची काही विचित्र कारणे समोर येत आहेत.

जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये आजच्या तरुण पिढीने आपल्या सुख दुःखाची एक नवीन परिभाषा सिमीत केली असून त्यांनी आखलेल्या परिघामधून ते थोडे जरी दुर्लक्षित झाले  तर आपले जीवन त्यांना व्यर्थ वाटू लागते आणि त्यातून ते टोकाचे पाऊल उचलत असल्याचे समोर आले आहे.

भारतामध्ये  2018  आणि 2019 या दोन वर्षाच्या काळातील आत्महत्याच्या आकडेवारीची तुलना  केली तर 2019 मध्ये  तरुणांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 2018 मध्ये 89,407  तरुणांनी आत्महत्या केली होती तर 2019 मध्ये सुमारे 1.39 लाख लोकांनी आत्महत्या केली, त्यापैकी  93,061 जण तरुण वयोगटातील होते म्हणजेच 2019 मध्ये  आत्महत्यांमध्ये 4.4  टक्क्यांनी वाढ झाली आहे.

2019 मध्ये आत्महत्या करणाऱ्या नागरिकांमध्ये 67 टक्के तरुण लोक होते, ज्यांचे वय 18 ते 45 वर्षांदरम्यान आहे. यामध्ये कौटुंबिक समस्या, लग्नाशी संबंधित समस्या मानसिक आजाराच्या  समस्या तसेच  ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या व्यसनामुळे व प्रेम संबंधातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

आत्महत्या ही काही अचानक घडणारी घटना नाही, कारण आत्महत्या करणारी व्यक्ती ही प्रथम  मानसिक रित्या आजारी पडते आणि त्यांची दखल अथवा त्यावर उपाय होत नसल्यामुळे आत्महत्या वाढत असल्याचे तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेन्टरचे मनोविकार तज्ञ डॉ ओंकार माटे सांगतात.

तरुण पिढींमध्ये सहनशीलता फारच कमी असल्यामुळे अनेक तरुण निराशेच्या गर्तेत  व्यसनाच्या आहारी जातात. घरच्या व्यक्तींकडून तर कधी जवळच्या मित्र मैत्रिणीकडून अवहेलना झाली तर ही तरुण मंडळी लगेच व्यसनाला जवळ करतात, प्रेमभंग झाला, अपयश आले तर हिंदी चित्रपटातील नायक दारूची बाटली तोंडाला लावतात हे लहान वयात  नकळत संस्कारही याला कारणीभूत असल्याचे डॉ माटे यांना वाटते.

आज प्रत्येक व्यक्तीची ही जबाबदारी आहे की  त्यांनी आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांशी सुसंवाद साधला पाहिजे कारण सर्वच निराशाग्रस्त नागरिकाला समुपदेशक अथवा इतर मदत मिळतेच असे नाही. संपर्कात असलेल्या व्यक्तीत झालेले मुख्य बदल, तसेच त्यांच्या बदललेल्या सवयी यावर आपण लक्ष दिले तर प्रत्येक नागरिक हा समुपदेशक बनू शकेल, कारण या व्यक्तीना आपले म्हणणे ऐकणारा म्हणजेच संवाद साधणारा व्यक्ती हवा असतो असे डॉ ही माटे पुढे सांगतात.

कोरोना या महामारीच्या आजारामुळे समाजामध्ये असहाय्यता, अनिश्चितता,एकांतवास आणि आर्थिक ताण तणाव व नात्यांमध्ये दुरावा वाढला आहे  परिणामी नैराश्य, चिंता, झोपेचे आजार व एकूणच  मानसिक विकार वाढले असून  याचा परिणाम म्हणून संपूर्ण जगात आत्महत्यांचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत आहे असे सुअस्थ  हॉस्पिटलमधील क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट व व्यसन थेरपिस्ट डॉ. शीतल बिडकर यांनी सांगितले.

--------

(संपादनः पूजा विचारे)

September 10 World Suicide Prevention Day suicide rate among youth rise


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: September 10 World Suicide Prevention Day suicide rate among youth rise