दहशतवाद्यासह सात रेंजर्स ठार

पीटीआय
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

पाकच्या गोळीबाराला "बीएसएफ'चे जोरदार प्रत्युत्तर
जम्मू - जम्मू आणि काश्‍मीरमधील कथुआ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर आज पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा भंग करत जोरदार गोळीबार करण्यात आला. त्यास सीमा सुरक्षा दलातर्फे (बीएसएफ) जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले असून, त्यात पाकिस्तानचे सात रेंजर्स आणि एक दहशतवादी ठार झाले; तर "बीएसएफ'चा एक जवान जखमी झाला असल्याचे सांगण्यात आले.

"बीएसएफ'ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, आंतरराष्ट्रीय सीमेलगत कथुआतील हिरानगर येथील भारतीय चौकीवर सकाळी साडेनऊच्या सुमारास जोरदार गोळीबार केला. पाकिस्तानी रेंजर्स या निमलष्करी दलाकडे पाकिस्तानच्या सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे. त्यांनी केलेल्या या गोळीबारास भारतीय बाजूकडून "बीएसएफ'च्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. "बीएसएफ'कडून करण्यात आलेल्या गोळीबारात पाकिस्तानी रेंजर्सचे सात जण ठार झाले असून, एक दहशतवादीही ठार झाल्याचे सांगण्यात आले.

या घटनेत पाकिस्तानचे पाच रेंजर्स ठार झाल्याचे वृत्त पाकिस्तानातील माध्यमांकडून दिले जात आहे. मात्र, भारताने दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये सात रेंजर्स आणि एक दहशतवादी ठार झाला असल्याचा खुलासा "बीएसएफ'कडून करण्यात आला आहे. बुधवारी रात्रीपासून भारताच्या चौकीवर गोळीबार करण्यात येत होता. आज सकाळी पाकिस्तानी रेंजर्सकडून करण्यात आलेल्या गोळीबारात "बीएसएफ'चे कॉन्स्टेबल गुरनामसिंग जखमी झाल्यानंतर प्रत्युत्तरादाखल जोरदार गोळीबार करण्यात आला. जखमी झालेल्या गुरनामसिंग यांना जम्मूतील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाकिस्तानी बाजूकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला आम्ही तोडीसतोड प्रत्युत्तर दिले. त्यात पाकिस्तानी रेंजर्सचे मोठे नुकसान झाले, असे "बीएसएफ'कडून सांगण्यात आले.

Web Title: seven rangers killed with terrorist