दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन अधिकाऱ्यांसह सात जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाज्वा यांचा हा भारताला संदेश आहे. त्यांचे धोरण पूर्वीच्या लष्करप्रमुखांप्रमाणेच असणार आहे. आपणही त्यांना असाच "संदेश' देणे आवश्‍यक आहे.
- आर. के. सिंह, भाजप खासदार

जम्मू - जम्मू-काश्‍मीरमधील पाकिस्तानपुरस्कृत हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नसून, दहशतवाद्यांनी आज लष्कराच्या नगरोटा तळावर केलेल्या हल्ल्यात दोन अधिकारी आणि पाच जवान हुतात्मा झाले. यात महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. मेजर कुणाल मुन्नागीर गोसावी (पंढरपूर) आणि लान्स नायक संभाजी यशवंत कदम (नांदेड) अशी त्यांची नावे आहेत. जोरदार धुमश्‍चक्रीनंतर जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले; पण जवानांच्या मदतीसाठी पॅरा कमांडो आणण्याची वेळ आली. दुसरीकडे, सांबामध्ये सीमा सुरक्षा दलाच्या तळावर झालेल्या हल्ल्यात पोलिस उपमहानिरीक्षकांसह चार जवान जखमी झाले. जवानांच्या प्रत्युत्तरात तीन दहशतवादी ठार झाले.

दहशतवाद्यांनी यावर्षी 18 सप्टेंबर रोजी उरी येथे लष्कराच्या तळावर हल्ला केला होता. त्यात 19 जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर भारताने 29 सप्टेंबर रोजी दहशतवाद्यांच्या तळांवर "सर्जिकल स्ट्राईक' केले होते. त्यानंतर दहशतवाद्यांच्या कारवाया कमी होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत होती. मात्र प्रत्यक्षात त्यांनी छोटे-छोटे हल्ले सुरूच ठेवले होते. दहशतवाद्यांनी आज पुन्हा मोठा हल्ला करून सुरक्षेला सुरुंग लावला.

अत्याधुनिक शस्त्रे घेऊन आलेले दहशतवादी सोळाव्या कोअरच्या "166 तोफखाना केंद्रा'तील "ऑफिसर्स मेस'वर सकाळी साडेपाचच्या सुमारास बॉंबफेक करत आत घुसले. त्याचवेळी गस्तीसाठी असलेल्या जवानांवरही त्यांनी बेछूट गोळीबार केला, अशी माहिती लष्कराच्या उत्तर विभागाने दिली आहे.

दहशतवाद्यांच्या सुरवातीच्या हल्ल्यात यात तीन जण हुतात्मा झाले. मेजर कुणाल मुन्नागीर गोसावी (पंढरपूर), लान्स नायक संभाजी यशवंत कदम (नांदेड), राघवेंद्र अशी हुतात्मा झालेल्यांची नावे आहेत. त्यानंतर तीन दहशतवाद्यांनी आपला मोर्चा अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय असलेल्या दोन इमारतींकडे वळविला. या इमारतींमध्ये बारा जवान, दोन महिला आणि दोन मुले होती. या सर्वांना ओलिस ठेवल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. या सर्वांची सोडवणूक करताना आणखी एक अधिकारी व दोन जवान हुतात्मा झाले. या वेळी झालेल्या चकमकीत तीनही दशहतवाद्यांना ठार मारण्यात आले.

नगरोटा हे लष्कराच्या सोळाव्या कोअरचे मुख्यालय आहे. नियंत्रण रेषेपासून हे ठिकाण वीस किलोमीटर अंतरावर आहे. हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर जम्मू-श्रीनगर महामार्ग रहदारीसाठी बंद करण्यात आला होता, तसेच शाळाही बंद करण्यात आल्या होत्या. जम्मू शहरामध्ये अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून लष्कराने दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या लक्ष्याधारित हल्ल्यानंतरही काश्‍मीर खोऱ्यातील स्थिती अशांतच आहे. आता हिंसाचाराचे लोण जम्मूतही आल्याचे नगरोटावरील हल्ल्यातून सिद्ध झाले आहे.

असा झाला हल्ला
- पहाटे साडे पाच वाजता पोलिसांच्या वेशात आलेले दहशतवादी ऑफिसर्स मेसवर बॉंब फेकत तोफखाना केंद्रात घुसले
- लष्करी अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय, तसेच इतर कर्मचारी असलेल्या दोन इमारतींवर गोळीबार करत त्यात घुसण्याचा प्रयत्न
- यामुळे इमारतींमधील जवान आणि सामान्य नागरिक ओलिस असल्यासारखी स्थिती.
- पॅरा कमांडोंच्या जवानांनी ओलिसांना मुक्त केले.
- जवानांच्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार

सांबामध्ये तीन दहशतवाद्यांना मारले
दरम्यान, सांबा जिल्ह्यातही चामलीयाल गावात दहशतवाद्यांनी आज घुसखोरीचा प्रयत्न केला. मात्र, सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांचा हा प्रयत्न उधळून लावत तीन दहशतवाद्यांना ठार मारले. या वेळी झालेल्या चकमकीत पोलिस उपमहानिरीक्षकासह चार जवान जखमी झाले. सांबा जिल्ह्यातील रामगड येथील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत दहशतवाद्यांच्या गटाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर लष्कराने या भागात शोधमोहीम सुरू केली आहे.

अधिकाऱ्यांच्या पत्नींचे प्रसंगावधान
लष्करी तळावर घुसलेल्या दहशतवाद्यांचा जवानांच्या निवासी संकुलांमध्ये प्रवेश करण्याचा इरादा होता. तेथील नागरिकांना ओलीस ठेवणे त्यांना शक्‍य होते. मात्र, येथील दोन अधिकाऱ्यांच्या पत्नींनी प्रसंगावधान राखत अत्यंत धाडसीपणे या निवासी संकुलाचे प्रवेशद्वार घरगुती सामान लावून बंद करून टाकले. दोघींच्या या कृतीमुळे दहशतवाद्यांना संकुलामध्ये प्रवेश करणे अशक्‍य झाले.

Web Title: Seven soldiers, several militants killed in two Jammu attacks