
Swati Maliwal Video: 'वडीलच माझं लैंगिक शोषण करायचे' महिला आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितली आपबिती
नवी दिल्लीः दिल्लीच्या महिला आयोग अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी त्यांच्या बालपणीचा हृदय पिळवटून टाकणारा एक अनुभव शेअर केला आहे. त्यांचे वडील लहानपणी त्यांचं शोषण कसं करायचे, याबाबत त्यांनी आपबिती सांगितलं.
दिल्लीतल्या एका पुरस्कार सोहळ्यामध्ये दिल्लीच्या महिला आयोग अध्यक्ष स्वाती मलीवाल यांनी लहानपणी वाट्याला आलेलं दुःख व्यक्त केलं. कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलतांना त्या म्हणाल्या की, मी चौथीपर्यंत माझ्या वडिलांसोबत होते. तेव्हा माझ्यावर माझ्याच वडिलांकडून खूप अत्याचार झाले.
माझे वडील माझं लैंगिक शोषण करायचे, मला मारहाण करायचे. एवढंच नाही तर माझ्या वेणीला धरुन माझं डोकं भींतीवर आपटायचे. त्यामुळे मी रक्तबंबाळ व्हायचे, असा अनुभव त्यांनी शेअर केला.
'जी व्यक्ती अत्याचार सहन करते तीच व्यक्ती इतरांचं दुःख समजू शकते आणि जगाला हादरे देण्याची हिंमत तिच्यामध्येच असते. मीही अशाच दुःखातून आले आहे. माझे आजी-आजोबा आणि मावशीमुळे त्या अत्याचारातून बाहेर पडले' असा हृदयद्रावक अनुभव त्यांनी शेअर केला.