शबरीमला मंदिर वाद ; महिलांना 200 वर्षांपासून प्रवेशबंदी

शबरीमला मंदिर वाद ; महिलांना 200 वर्षांपासून प्रवेशबंदी

तिरुअनंतपुरम : शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात मासिक पाळी येण्याऱ्या वयातील महिलांना प्रवेशबंदीची प्रथा कधीपासून सुरू झाली, याबाबत तर्क-वितर्क आहेत. मात्र, 19 व्या शतकातील ब्रिटिश काळात झालेल्या सर्वेक्षणानुसार ही प्रथा 200 वर्षांपासून सुरू असल्याचे आढळले आहे. 

शबरीमला मंदिरात सर्वच म्हणजे 10 ते 50 वर्षे वयोगटातील महिलांनाही प्रवेश देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र, यावरून केरळमध्ये तीव्र आंदोलन सुरू झाले आहे. अनेक राजकीय पक्ष व धार्मिक संघटनांनी याचा निषेध केला असून, पूर्वपार चालत आलेली परंपरा मोडू नये, यासाठी निदर्शने केली आहेत. न्यायालयाच्या निर्णयाचे समर्थन करणारे व विरोध करणाऱ्यांमध्ये वादविवादाच्या फैरी झडत असताना, वसाहत काळात दोन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या मुद्यावर सर्वेक्षण करून तयार केलेला अहवाल हा यासंबंधीचा ग्राह्य पुरावा असल्याचा मतप्रवाह बंदीचे समर्थन करणाऱ्यांमध्ये आहे.

अय्यप्पा मंदिरात महिलांना बंदीची परंपरा शतकांपासूनची असून, ती पुढेही सुरू ठेवावी, असा त्यांचा आग्रह आहे. "मेमॉयर ऑफ सर्व्हे ऑफ द त्रावणकोर अँड कोचिन स्टेट' या अहवालाचे दोन भाग तत्कालिन मद्रास सरकारने प्रसिद्ध केले आहेत. यात असे नमूद केले आहे, की मासिक पाळी येण्याच्या वयातील महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेशबंदीची परंपरा 200 वर्षांपासून चालत आली आहे. तत्कालिन मद्रास पायदळाचे लेफ्टनंट बेंजामिन स्वाईन वॉर्ड आणि पीटर इर कॉनर यांनी हा पाच वर्षांच्या संशोधनानंतर 1820 मध्ये यासंबंधीचा सर्व्हे अहवाल पूर्ण केला. 1893 आणि 1901 मध्ये तो दोन भागांत प्रसिद्ध झाला आहे. 

"वृद्ध महिला व लहान मुली यांना मंदिरात जाण्यास मुभा आहे. मात्र, तरुण वयातील स्त्रियांना काही वर्षे मंदिरात प्रवेश करण्यास मनाई आहे. मंदिर परिसरात लैंगिक संबंध आल्यास त्याचा भगवान अय्यप्पावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा समज आहे,' असे अहवालात म्हटले आहे.

त्रावणकोर व कोचिन (कोची) या संस्थानावरील हा अहवाल म्हणजे विश्‍वासार्ह ऐतिहासिक पुरावा असल्याकडे लक्ष वेधून मंदिरातील प्रवेशबंदीचा "अलिखित कायदा' प्रदीर्घ काळापासून अमलात आहे, असे इतिहासाचे अभ्यासक एम. जी. शशिभूषण यांनी सांगितले. या अनौपचारिक कायद्याला 1991 मध्ये वैधानिक स्वरूप मिळाले.

केरळ उच्च न्यायालयाने कायदेशीर रूपात तो स्वीकारला, अशी माहिती त्यांनी दिली. या परंपरेबद्दल अनभिज्ञ असलेली 10 ते 50 वयोगटातील एखादी महिला मंदिरात गेल्याची घटना दुर्मीळात दुर्मीळ आहे, असेही शशिभूषण म्हणाले. 

अहवालातील नोंदी... 
- अय्यप्पा देवाचे वर्णन "चौर्यमूल्य शास्ता' असे केले आहे 
- काही वेळा "पर्वतीय देवतेचे मंदिर' असा उल्लेख 
- त्याकाळीही दर्शनासाठी भक्तांचा महापूर 

राजमातेचा मंदिर प्रवेश 

तत्कालिन त्रावणकोर संस्थानच्या राणीच्या माता सेतू पार्वतीबाई यांनी मासिक धर्म सुरू असण्याच्या वयात मंदिरात प्रवेश केल्याचा दावा केला जातो. यासंदर्भात बोलताना शशिभूषण म्हणाले, की राणीच्या मातेने 42 व्या वर्षी मंदिरात प्रवेश केला होता, हे सत्य आहे. मात्र, त्या वेळी त्यांचे गर्भाशय काढलेले होते. त्यामुळे त्या वयात मंदिरात जाऊन दर्शन घेण्यास त्या पात्र होत्या, असा खुलासा त्रावणकोर राजघराण्याने यापूर्वीच केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com