अमित शहा घेणार नवनिर्वाचित खासदारांचा 'क्लास'

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 जुलै 2019

- अमित शहा, राजनाथसिंह, नितीन गडकरीही राहणार उपस्थित. 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत झालेल्या विजयानंतर अनेक नवे चेहरे खासदार म्हणून संसदेत गेले आहेत. या सर्व नवनियुक्त खासदारांना संसदेच्या कामकाजाची माहिती व्हावी, यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनेकांना पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. त्यामुळे संसदेत कशाप्रकारे कामकाज चालते, कशाप्रकारे प्रश्नोत्तरे, विधेयक मांडले जाते, प्रस्ताव तसेच इतर कामकाज कसे चालते, याची माहिती व्हावी, यासाठी ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन नवनिर्वाचित सदस्यांना केले जाणार आहे. त्यासाठी अमित शहा, राजनाथसिंह यांच्यासह नितीन गडकरी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या सर्व नवनिर्वाचित खासदारांना 3-4 जुलै आणि 9-10 जुलै यादरम्यान मार्गदर्शन केले जाणार आहे. 

दरम्यान, 3 आणि 4 जुलैदरम्यान संसदेत 'प्रबोधन कार्यक्रम' आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला सर्व खासदारांना संबोधित करणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shah Rajnath Azad And Gadkari To Train Newly Elected Members Of Lok Sabha