तुटे 'विश्‍वासा'चे जाळे

Shailesh Pande Article about bank information theft
Shailesh Pande Article about bank information theft

एखाद्या गोष्टीवरची नि:संशय श्रद्धा म्हणजे विश्‍वास. इंग्रजीत याला 'ट्रस्ट', 'फेथ' वगैरे म्हणतात. भविष्यातील कृतीच्या संदर्भात एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर किंवा यंत्रणेवर ठेवलेल्या श्रद्धेला 'विश्‍वास' असे नाव आहे आणि सामाजिक जीवनासह खासगी-वैयक्तिक जीवनातही 'विश्‍वास' हे एक मूल्य म्हणून प्रस्थापित झाले आहे. न्यायालयात धर्मग्रंथावर हात ठेवून शपथपूर्वक बयान घेतले जाते तेव्हा, धर्मग्रंथाची कुणी खोटी शपथ घेणार नाही, या विश्‍वासाचे गृहितक त्यामागे असते. आपल्या संस्कृतीत एखाद्याच्या डोक्‍यावर हात ठेवून शपथ घेण्याची परंपरा आहे. डोक्‍यावर हात ठेवून कुणी खोटे बोलणार नाही, ही त्यामागची श्रद्धा. विश्‍वास ठेवणाऱ्यांची आणि तो टिकवणाऱ्यांचीही संख्या मोठी असल्याने विश्‍वासाचे मूल्य बळकट होत गेले. विश्‍वास ठेवल्याखेरीज आणि तो टिकवल्याखेरीज कोणताही व्यवहार, एवढेच नव्हे तर कोणतेही नातेसुद्धा पुढे जात नाही. बॅंका आणि ग्राहकांचे नाते गेली कित्येक दशके विश्‍वासाच्या नात्यावरच तगले, तरले आणि बहरलेसुद्धा. याच विश्‍वासावर ग्राहकांनी बॅंका मोठ्या केल्या आणि बॅंकांनी ग्राहकांना समृद्ध केले. आपला पैसा कुठेही जाणार नाही, कुणीही चोरणार नाही, ही ग्राहकांची श्रद्धा त्यामागे असते. त्याच श्रद्धेने दागदागिन्यांसह सेव्हिंग सर्टिफिकेटसारखी महत्त्वाची कागदपत्रेही ग्राहक बॅंकांच्या लॉकरमध्ये ठेवत आले आहेत. परंतु, माहितीच्या महाजालाच्या प्रसरणासोबत बॅंकांवरच्या विश्‍वासाचे हे जाळे तुटत असल्याचे एक ताजी बातमी सांगते.

एक कोटी भारतीयांची बॅंकांमधील तपशीलवार माहिती (डेटा) प्रत्येकी फक्त 20 पैसे दराने बदमाशांना विकली गेल्याचे निष्पन्न दिल्लीतील एका प्रकरणाच्या तपासांती झाले आहे. कार्ड नंबर, कार्डधारकाचे नाव, जन्मतारीख आणि मोबाईल क्रमांकासह बरीच माहिती इतक्‍या स्वस्तात विकली गेली आणि त्या कृत्यात बॅंकांमधील अंतस्थांचाही सहभाग होता, असे या प्रकरणाच्या तपासात दिसले. ऐंशी वर्षांच्या वृद्धेच्या क्रेडिट कार्डावरून सुमारे दीड लाख रुपयांची अफरातफर झाली. त्या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे गेल्यावर त्यांनीच बदमाशांचे टोळके व त्यांची कार्यपद्धती शोधून काढली. असे बदमाश सर्व क्षेत्रांत आहेत. प्रश्‍न आहे तो, ज्यांच्यावर आपण विश्‍वास टाकतो, त्यांनी तो टिकवण्याचा. बॅंकांमधील काही लोक या अपकृत्यात सहभागी असल्याचा पोलिसांचा दावा खरा असेल तर साऱ्याच बॅंका आपसूक आरोपीच्या पिंजऱ्यात जाऊन उभ्या झाल्या, असे म्हटले पाहिजे. याच डेटाच्या आधारे दिल्लीतून रोज हजारो-लाखो लोकांना भामट्यांचे कॉल्स येतात. 'तुमचे क्रेडिट कार्ड लॉक केले जाईल', असे धमकीवजा बोलून 'तुमचा पासवर्ड-पिन शेअर केला तर आम्ही क्रेडिट कार्ड लॉक होऊ देणार नाही', अशी पुस्ती तिकडचा भामटा जोडतो तेव्हा सामान्य माणूस घाबरतो आणि अधिकची माहितीही देऊन टाकतो. असे प्रकार घडतात, हे माहिती असलेली व्यक्ती अशा भामट्यांना टर्रावून विषय संपवितात; पण सामान्यांची फसवणूक होते. कारण तो कुणावरही विश्‍वास ठेवतो. 'तुम्ही 3 कोटी जीबीपीचे (ग्रेट ब्रिटन पौंड) बक्षीस जिंकले आहे', असे संदेश मोबाईलवर सर्रास येतात. 3 कोटी गुणिले 80-85 रुपये, असा हिशेब करून पाहिला जातो, तेव्हा संदेश वाचणाऱ्याचे डोळेच विस्फारतात. तो मग हवी ती माहिती पाठवून या जाळ्यात अडकतो आणि लुबाडला जातो. सांगायचे म्हटले तर भामटेगिरीचे असे शेकडो प्रकार आहेत आणि पोलिसांसह साऱ्याच यंत्रणा त्यांना रोखण्यात अपयशी ठरल्या आहेत. नाव, गाव, वय, फोन नंबरच नव्हे तर कार्डच्या मागे असलेला सीव्हीव्ही नंबरसुद्धा भामट्यांकडे जात असेल तर बॅंकांना आरोपी ठरवलेच पाहिजे. भामटे त्या साऱ्या माहितीचा वापर करून वेगवेगळ्या फोन नंबर्सवरून बोलून लोकांना फसवत असतील तर पोलिसांनाही आरोपी ठरवले पाहिजे. कारण अशा प्रकरणांतील तक्रारी शेवटाला गेल्याची फारशी उदाहरणे नाहीत. विश्‍वास शब्दांतून नव्हे तर कृतीतून कमवावा लागतो. आपल्या व्यवहारांवर तंत्रज्ञानाचे जाळे पसरले म्हणून ते व्यवहार सुरक्षित झाले आणि विश्‍वासाची गरज राहिलेली नाही, असे मानता येणार नाही.

तंत्रज्ञानाच्या वर्चस्वातून पारदर्शकता येत असते. माहिती सहजपणे इकडून तिकडे जाऊ शकते. भामटे कुठेही असू शकतात आणि ते या पारदर्शकतेचा लाभ कसाही उठवू शकतात. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणारेच नव्हे तर मानवी भावना व व्यवहार यातसुद्धा विश्‍वासाचे वातावरण राहिलेले नाही. त्यामुळे 'विश्‍वासा'च्या मूल्यावर विश्‍वास ठेवणाऱ्या भाबड्यांनीच अधिक सावध झाले पाहिजे. तंत्रज्ञानावर आंधळा विश्‍वास ठेवू नये. ते वापरणाऱ्या यंत्रणांवर ठेवू नये... आणि अगदी जवळच्या माणसांवरसुद्धा विश्‍वास ठेवण्याची हिंमत होऊ नये, असा काळ आला आहे. एकीकडे सावधगिरी आणि दुसरीकडे आक्रमकतेने विश्‍वासाला तडा देणाऱ्या मुद्द्यांचा पाठपुरावा केला पाहिजे. ज्या यंत्रणेवर आपण विश्‍वास ठेवला, तिलाच थेट कोर्टात खेचले पाहिजे आणि जेरीस आणले पाहिजे. जगाच्या आरंभापासून सुरू झालेल्या विश्‍वासाच्या नात्यावर मानवाने प्रतिसृष्टी निर्माण केली. सूर्य रोज उगवेल हा विश्‍वास जसा दुर्दम्य आहे, तसाच विश्‍वास नवनवीन शोधांवर मानवजातीने ठेवला म्हणून जग इथवर आले आणि मानवी जगणे पूर्वीपेक्षा अधिक सुखकर झाले. आता तंत्रज्ञानाची गती वाढली असेल आणि त्यामुळे पारदर्शकताही वाढत असेल तर विश्‍वास टिकवण्याच्या प्रयत्नांचे पडदे त्यावर लागायला नकोत का? विश्‍वासाच्या मूल्याची पुन:प्रतिष्ठापना आपल्या साऱ्या जीवन व्यवहारात व्हायला नको का?

(लेखात सकाळ विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com