राष्ट्रपती निवडणूक : शरद पवार, गोपाळकृष्ण गांधींना पसंती

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 12 मे 2017

विरोधकांची खलबते
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, 'भाकप' नेते डी. राजा आदी नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये विरोधकांकडून संयुक्त उमेदवार देण्याबाबत चर्चा झाली. या भाजपविरोधी आघाडीमध्ये बिजू जनता दलाप्रमाणेच दक्षिण भारतातील अनेक पक्ष सहभागी झाले आहेत.

नवी दिल्ली : आगामी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून, या सर्व पक्षांकडून संयुक्त उमेदवार दिला जाऊ शकतो. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार, कॉंग्रेस नेत्या आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार, संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते शरद यादव आणि पश्‍चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांच्या नावांना बहुतेक नेत्यांनी पसंती दिली असून, काही नावांवर अद्याप चर्चा सुरू असल्याचे समजते.

कॉंग्रेस, डावे पक्ष, राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक पक्ष नसणाऱ्या सर्वांनाच ही नावे मान्य होऊ शकतील, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे. शरद पवार यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव लक्षात घेता ते या निवडणुकीमध्ये 'गेंम चेंजर' ठरू शकतात, असे काहींना वाटते. कॉंग्रेस नेत्या असलेल्या मीरा कुमार यांची दलित पार्श्‍वभूमीदेखील या निवडणुकीमध्ये महत्त्वपूर्ण ठरू शकते. भाजपेतर पक्षांचा त्यांना पाठिंबा मिळू शकतो. समाजवादी नेते शरद यादव यांची प्रदीर्घ संसदीय कारकीर्द लक्षात घेता तेही भाजप उमेदवारासमोर तगडे आव्हान निर्माण करू शकतात, असे कॉंग्रेसमधील एका नेत्याने सांगितले.

गांधींशी चर्चा
महात्मा गांधी यांचे नातू असणारे गोपाळकृष्ण गांधी नावाजलेले विद्वान आहेत, त्यांना उमेदवार केले तर अन्य पक्षही पाठिंबा देऊ शकतात. तृणमूल कॉंग्रेस त्यांच्या नावासाठी विशेष आग्रही आहे. काही बड्या नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधून चर्चा केल्याचे सांगत गोपाळकृष्ण गांधी यांनी यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

Web Title: sharad pawar, gandhi prefered in presidential elections