शरद पवार, डॉ. जोशी यांना 'पद्मविभूषण'

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 जानेवारी 2017

असे आहेत पुरस्कार

07
पद्मविभूषण

07
पद्मभूषण

75
पद्मश्री

नवी दिल्ली - देशातील दिग्गज राजकीय नेत्यांपैकी एक असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक मंडळाचे सदस्य डॉ. मुरलीमनोहर जोशी, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा, लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा (दोघांनाही मरणोत्तर), प्रसिद्ध गायक येसुदास, आध्यात्मिक क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तिमत्त्व सद्‌गुरू जग्गी वासुदेव आणि शास्त्रज्ञ प्रा. यू. आर. राव यांना नागरी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च "पद्मविभूषण' पुरस्कार जाहीर झाला आहे.

मोहनवीणा वाद्याचे जनक, शास्त्रीय संगीततज्ज्ञ विश्‍वमोहन भट, पत्रकार चो रामस्वामी (मरणोत्तर), थायलंडच्या राजकुमारी महाचक्री सिरिनधोर्न आदी सात जणांना "पद्मभूषण' पुरस्काराने, तसेच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, हॉकी संघाचा कर्णधार पी. श्रीजेश, ऑलिंपिक पदकविजेती महिला कुस्तीगीर साक्षी मलिक, ऍथलिट दीपा कर्मकार, पॅरा ऍथलिट दीपा मलिक, विकास गौडा, देहूचे डॉ. सुहास मापुसकर यांच्यासह 75 जणांना "पद्मश्री' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. कला, समाजसेवा, साहित्य, क्रीडा, विज्ञान, उद्योग, वैद्यकीय सेवा, शिक्षण, प्रशासकीय सेवा आदी वेगवेगळ्या क्षेत्रांतील 89 नामांकित चेहऱ्यांना या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यात "पद्मविभूषण' पुरस्कार विजेत्यांमध्ये सात, "पद्मभूषण' विजेत्यांमध्ये सात आणि "पद्मश्री' पुरस्कार विजेत्यांमध्ये 75 जणांचा समावेश आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या मंजुरीनंतर केंद्र सरकारतर्फे या पुरस्कारांची औपचारिक घोषणा करण्यात आली. पुरस्कारविजेत्या 89 जणांमध्ये 19 महिला आहेत, तर पाच जण परदेशी नागरिक, अनिवासी भारतीय आणि भारतीय वंशाचे आहेत. सहा जणांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आले आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाईल.
यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या यादीवर राजकीय नेत्यांची छाप ठळकपणे दिसून येत आहे. पाच दशकांहून अधिक काळ महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणावर ठसा उमटविणारे त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसारख्या महत्त्वाच्या क्रीडा संस्थांचे नेतृत्व करणारे शरद पवार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविणारे आणि वाजपेयी सरकारच्या काळात मनुष्यबळ विकासमंत्री राहिलेले डॉ. मुरलीमनोहर जोशी, आपल्या मिस्कील कार्यशैलीने लोकसभेचे कामकाज चालविणारे माजी लोकसभाध्यक्ष पी. ए संगमा, भाजपचे दिवंगत नेते आणि मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांना "पद्मविभूषण' पुरस्कार देण्यात आला आहे.

"पद्मभूषण' पुरस्कार विजेत्यांमध्ये साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील प्रा. देविप्रसाद द्विवेदी, आरोग्य क्षेत्रातील तेहम्तोन उडवाडीया, आध्यात्मिक क्षेत्रातील योगगुरू स्वामी निरंजन नंदा सरस्वती, गुजरातमधील आध्यात्मिक गुरू रत्नसुंदर महाराज यांचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त प्रसिद्ध गायक कैलाश खेर, गायिका अनुराधा पौडवाल, हिंदी साहित्यिक डॉ. नरेंद्र कोहली, शेफ संजीव कपूर, समाजसेवेतील कार्याबद्दल अप्पासाहेब धर्माधिकारी, उत्तर प्रदेशातील डॉ. मदन माधव गोडबोले, तमिळनाडूतील सामाजिक कार्यकर्त्या निवेदिता रघुनाथ भिडे, क्रिकेटपटू शेख नाईक, थाळीफेकपटू विकास गौडा आदींना "पद्मश्री' पुरस्कार मिळाला आहे.
महाराष्ट्राला सर्वाधिक, म्हणजे आठ पद्म पुरस्कार मिळाले असून, पाठोपाठ गुजरातला सात, कर्नाटक, केरळ, तेलंगण, उत्तर प्रदेश आणि दिल्लीला प्रत्येकी सहा पुरस्कार मिळाले आहेत.

असे आहेत पुरस्कार

07
पद्मविभूषण

07
पद्मभूषण

75
पद्मश्री

Web Title: Sharad Pawar, Murli Manohar Joshi conferred Padma Vibhushan award