राष्ट्रपतिपदासाठी पवार उमेदवार नाहीत- राष्ट्रवादी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 एप्रिल 2017

वार हे पक्षाध्यक्ष, संसदीय पक्षाचे नेते आहेत, त्यामुळे राष्ट्रपतिपदासाठी ते उमेदवार असण्याची शक्‍यताच उद्‌भवत नाही. भारतीय राजकारणात इतर अनेक नेते आहेत जे राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवू शकतात. पवार या स्पर्धेत नाहीत

नवी दिल्ली -  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत उतरण्याच्या शक्‍यतेचा त्यांच्या पक्षाने स्पष्ट शब्दांत इन्कार केला. त्याचबरोबर पक्षाच्या कॉंग्रेसमधील विलीनीकरणाबाबत होत असलेली मागणीही फेटाळून लावण्यात आली.

पत्रकारांबरोबरच्या वार्तालापात बोलताना पक्षाचे प्रवक्ते डी. पी. त्रिपाठी यांनी वरील दोन्ही शक्‍यता आणि कल्पना साफ नाकारल्या. जुलैमध्ये असलेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी पवार हे उमेदवार असणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, की पवार हे पक्षाध्यक्ष, संसदीय पक्षाचे नेते आहेत, त्यामुळे राष्ट्रपतिपदासाठी ते उमेदवार असण्याची शक्‍यताच उद्‌भवत नाही. भारतीय राजकारणात इतर अनेक नेते आहेत जे राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवू शकतात. पवार या स्पर्धेत नाहीत.

राष्ट्रपतिपदासाठी सर्वसंमत उमेदवाराची आवश्‍यकता व्यक्त करताना त्रिपाठी म्हणाले, की सत्तारूढ भाजप आणि त्यांच्या आघाडीकडे 15 हजार मते कमी आहेत. याचा अर्थ सत्तारूढ पक्षाला राष्ट्रपतिपदासाठी त्यांचा उमेदवार लादता येणार नाही. त्यामुळेच या पदासाठी सर्वसंमत उमेदवाराबाबत सत्तापक्षाने पुढाकार घेऊन विरोधी पक्षांबरोबर सल्लामसलत करावी. याबाबत त्यांच्याकडून कशा हालचाली होतात, सर्वसंमत उमेदवाराच्या कल्पनेस ते अनुकूल आहेत की नाहीत हे त्यांच्या आगामी काळातील हालचालींवरून लक्षात येईल. अजून निवडणुकीसाठी वेळ आहे, त्यामुळे सत्तापक्षाच्या भूमिकेची प्रतीक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही असेल. ते काय भूमिका घेतात त्याबाबत आमचा पक्ष विचार करील.

कॉंग्रेसचे एक वरिष्ठ नेते के. व्ही. थॉमस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेस या पक्षांनी कॉंग्रेसमध्ये विलीन व्हावे, असा एक प्रस्ताव अलीकडे दिला होता. तो त्रिपाठी यांनी स्पष्टपणे फेटाळून लावला. राष्ट्रवादी कॉंग्रेसला विलीनीकरणात रस नाही, आम्ही स्वबळावर विस्तारू, असे त्यांनी सांगितले. अर्थात कॉंग्रेसबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सहकार्य यापुढेही चालू राहील, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

Web Title: Sharad Pawar not a presidential candidate, says NCP