‘पवार-सोनिया भेटीनंतरच पाहू’

Congress
Congress

नवी दिल्ली - महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची धावपळ रंगली असताना काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनी मात्र या प्रयत्नांवर मौन पाळले असून, शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट होत नाही तोपर्यंत काहीही स्पष्टता नाही, असा संदिग्ध पवित्रा आज घेतला. रविवारी (ता. १७) पवार आणि सोनिया यांची दिल्लीत भेट होणे अपेक्षित आहे.  

शिवसेनेसोबत जाण्याला महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचा प्रचंड आग्रह आणि केंद्रीय काँग्रेसमधील केरळ लॉबीचा असलेला विरोध या पार्श्‍वभूमीवर सोनिया गांधींनी प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसशी सहमती झाल्याखेरीज निर्णय होणार नाही, असा मधला मार्ग काढला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाशी चर्चा करण्यासाठी अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल या नेत्यांनाही पाठविले होते. विशेष म्हणजे, काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेना नेतृत्वाचीही भेट घेतल्याचे खात्रीलायक सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र पक्षातून उफाळेल्या मतभेदानंतर शिवसेनेशी झालेल्या भेटीवर काँग्रेसमधून सोईस्कर मौन पाळले जात आहे. 

शिवसेना नेत्यांशी भेट झालेली नाही, असा स्पष्ट इन्कार काँग्रेसच्या उच्चपदस्थ नेत्यांनी केला नाही, तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या इन्काराचा हवालाच काँग्रेसचे नेते देत आहेत. अशा चर्चेसाठी उत्साह दाखविलेले नेते विजय वडेट्टीवार यांना श्रेष्ठींनी फटकारल्याचे समजते. सोबतच, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेशी होणाऱ्या संभाव्य चर्चेपासून त्यांना दूर ठेवण्याचेही पक्षात घाटत असल्याचे कळते. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबद्दलही काँग्रेसमधील एका गटाला साशंकता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात किमान समान कार्यक्रम, सत्तेतील भागिदारीचे सूत्र ठरल्याचे राज्यातील नेत्यांकडून सांगितले जात असले तरी काँग्रेसचे केंद्रीय नेते अद्याप मौनातच आहेत. 

नेता निवडीसाठी मिस्त्री निरीक्षक?
महाराष्ट्रातील विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी काँग्रेस नेतृत्वाने वरिष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री यांना निरीक्षक म्हणून नेमल्याचे समजते. लवकरच आमदारांची बैठक बोलावून नेता निवडीसाठी त्यांचा कल जाणून घेतला जाईल. या पदासाठी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com