मुलींच्या अब्रूपेक्षा मत अधिक महत्त्वाचे - शरद यादव

वृत्तसंस्था
बुधवार, 25 जानेवारी 2017

मुलीची अब्रू गेली तर ती फक्त गल्ली किंवा गावाची जाते. पण, मतच विकले गेले तर ती देशाची अब्रू गेल्यासारखे आहे. यामुळे आपले स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही.

पाटणा - मुलींच्या अब्रूपेक्षा मत अधिक महत्त्वाचे असल्याचे वक्तव्य जनता दल युनायटेड (जदयू) माजी अध्यक्ष व खासदार शरद यादव यांनी केले आहे.

शरद यादव हे सतत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. पाटणा येथील एका कार्यक्रमात त्यांनी मुलींच्या अब्रूपेक्षा मतांना अधिक महत्त्व दिल्याने हा महिलांचा अपमान असल्याचे बोलले जात आहे. यादव यांच्या या वक्तव्यावरून विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. शरद यादव यांनी राजकारणाचा घसरत चाललेला स्तर आणि मत खरेदी विषयांसंबंधीही चिंता व्यक्त केली.

शरद यादव म्हणाले, की मुलीची अब्रू गेली तर ती फक्त गल्ली किंवा गावाची जाते. पण, मतच विकले गेले तर ती देशाची अब्रू गेल्यासारखे आहे. यामुळे आपले स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही. पैशाच्या जोरावर आजकाल मते खरेदी किंवा विकली जातात. मतांचे महत्त्व पटवून देण्याची गरज आहे. दक्षिण भारतात खासदार किंवा आमदार बनण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. पैशाच्या कमतरतेमुळे आमचा पक्ष उत्तर प्रदेशात निवडणुका लढविण्यास असमर्थ आहे. मी अनेक वर्षे पक्ष चालविला आहे, पण, पक्षात अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली नव्हती.

Web Title: sharad yadav controversial statement