राष्ट्रपती निवडणुकीबाबत पवार-सोनिया यांची चर्चा 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 एप्रिल 2017

चर्चेचे स्वरूप सर्वसाधारणच होते, असे पवार यांनी सांगितले. यासंदर्भात विविध विरोधी पक्षांशी संपर्क व चर्चा करण्याची जबाबदारी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी पार पाडतील, असेही पवार यांनी सांगितले. 

नवी दिल्ली - राष्ट्रपतिपदाच्या आगामी निवडणुकीत विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवार उभा करण्याच्या संदर्भात कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आज येथे चर्चा झाली.

चर्चेचे स्वरूप सर्वसाधारणच होते, असे पवार यांनी सांगितले. यासंदर्भात विविध विरोधी पक्षांशी संपर्क व चर्चा करण्याची जबाबदारी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी पार पाडतील, असेही पवार यांनी सांगितले. 

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांतर्फे संयुक्त उमेदवार उभा करण्याच्या संदर्भात सोनिया गांधी यांनी गेल्या काही दिवसांत विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांबरोबर सल्लामसलत केली होती. त्याच मालिकेत सोनिया गांधी यांनी पवार यांनाही निमंत्रित करून या विषयावर चर्चा केली. सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत उभे राहण्याचा प्रस्ताव केला काय, असे विचारले असता, पवार यांनी असा कोणताही प्रस्ताव त्यांनी केला नसल्याचे स्पष्ट केले. चर्चेचे स्वरूप सर्वसाधारण होते आणि कोणत्याही नावांवर चर्चा करण्यात आली नाही. विरोधी पक्षांतर्फे निवडणूक लढविण्याचे स्वरूप कसे असावे, यावरच चर्चा झाली. सत्तारूढ पक्षाकडे सुमारे वीस हजार मतांची कमतरता असली तरी ती भरून काढण्याच्या उपाययोजना त्यांच्याकडे आहेत आणि तेवढी मते मिळविण्याची त्यांची क्षमता असेल याचाही चर्चेत उल्लेख झाला. त्यामुळे विरोधी पक्षांतर्फे एकप्रकारे प्रतीकात्मक लढतच दिली जाईल, असेही मत चर्चेत व्यक्त झाले. 

विरोधी पक्षांमधील समन्वयाची जबाबदारी सीताराम येचुरी यांच्याकडे देण्यात आलेली असून, तेच यापुढे संपर्क साधून रणनीती आखतील असे ठरले आहे. सोनिया गांधी यांनी आतापर्यंत पवार यांच्यासह येचुरी, डी. राजा (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), शरद यादव व के. सी. त्यागी, नितीशकुमार, ममता बॅनर्जी, लालूप्रसाद यादव यांच्याशी चर्चा केली आहे. लालूप्रसाद कदाचित दिल्लीत येऊन प्रत्यक्ष भेटण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: Sharad Yadav Meets Sonia Gandhi Amid Talks Of Common President Nominee By Opposition