पक्षावर माझाही समान हक्क : शरद यादव

उज्ज्वलकुमार
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

पक्षनेते पदावरून हटविल्याच्या निर्णयामुळे मी अजिबात विचलित झालेलो नाही. आणिबाणीच्या काळातही जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सरकारला विरोध केल्यानंतर तत्कालीन सरकारचा पराभव झाला होता. मी अद्यापही महाआघाडीसोबतच आहे.

पाटणा : संयुक्त जनता दल (जदयू) हा पक्ष जितका नितीशकुमार यांचा आहे, तितकाच माझाही आहे, असे पक्षाचे माजी अध्यक्ष शरद कुमार यांनी आज म्हटले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा देण्यावरून वाद झाल्याने शरद यादव यांना राज्यसभेतील सभागृह नेतेपदावरून काढून टाकण्यात आले आहे. 

तीन दिवसांच्या संवाद यात्रेनंतर आज पाटण्यात परतलेल्या शरद यादव यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. "नितीशकुमार यांचा "जदयू' सरकारी आहे आणि आम्ही जनतेच्या "जदयू'बरोबर आहोत, असे यादव म्हणाले. "पक्षनेते पदावरून हटविल्याच्या निर्णयामुळे मी अजिबात विचलित झालेलो नाही. आणिबाणीच्या काळातही जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सरकारला विरोध केल्यानंतर तत्कालीन सरकारचा पराभव झाला होता. मी अद्यापही महाआघाडीसोबतच आहे,' असे यादव यांनी सांगितले. शरद यादव यांच्या संवाद यात्रेत पक्षाचा एकही मोठा नेता सामील झाला नव्हता. मात्र, आपल्या संपर्कात पक्षाचे अनेक नेते असल्याचा यादव यांचा दावा आहे. 

या टीकेमुळे यादव यांची पक्षातून लवकरच हकालपट्टी होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 19 ऑगस्टला पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक असून यामध्ये शरद यादव यांच्या हकालपट्टीवर आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी होण्याबाबत शिक्कमोर्तब होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: sharad yadav said i am with mahagathbandahn