वक्तव्यावर ठाम : शरीफ 

पीटीआय
मंगळवार, 15 मे 2018

सरकारकडून इन्कार 
शरीफ यांचे विधान निखालस खोटे असल्याचा दावा पाकिस्तान सरकार आणि लष्कराकडून करण्यात आला. शरीफ यांचे हे विधान दिशाभूल करणारे असल्याची टीकाही या वेळी करण्यात आली. 

इस्लामाबाद - मुंबईवर 2008 मध्ये झालेल्या हल्ल्यासाठी पाकिस्ताननेच दहशतवादी पाठविले होते, या आपल्या विधानाचे पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज समर्थन केले. कोणतेही परिणाम झाले तरी सत्य तेच बोलेन, अशी ठाम भूमिकाही त्यांनी घेतली आहे. 

पाकिस्तानमध्ये दहशतवादी सक्रीय असल्याची कबुली शरीफ यांनी एका मुलाखतीदरम्यान दिल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. दहशतवाद्यांना सीमेपार धाडून मुंबईतील लोकांना मारण्याच्या पाकिस्तानच्या धोरणावर शरीफ यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला उत्तर देण्यासाठी पाकिस्तान सरकारला आज राष्ट्रीय सुरक्षा समितीची उच्चस्तरीय बैठक बोलवावी लागली. शरीफ यांच्या पक्षानेही त्यांच्या विधानाबाबत नाराजी व्यक्त करत आरोप फेटाळले आहेत. या पक्षाचे प्रमुख शरीफ यांचे बंधूच आहेत. हा वाद झाल्यानंतरही शरीफ यांनी आज, "मी काय चुकीचे बोललो? काही झाले तरी मी खरे तेच सांगेन,' अशी प्रतिक्रिया दिली. माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ, माजी मंत्री रेहमान मलिक आणि माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार महमूद दुराणी यांनाही माझे म्हणणे मान्य आहे, असा दावाही शरीफ यांनी केला. 

सरकारकडून इन्कार 
शरीफ यांचे विधान निखालस खोटे असल्याचा दावा पाकिस्तान सरकार आणि लष्कराकडून करण्यात आला. शरीफ यांचे हे विधान दिशाभूल करणारे असल्याची टीकाही या वेळी करण्यात आली. 

Web Title: sharif stay on mumbai firing statement