राज्यसभेत आझाद, नक्वी यांच्यात खडाजंगी

वृत्तसंस्था
शनिवार, 1 एप्रिल 2017

लंचब्रेकनंतर सभागृहात उपस्थित असलेल्या विरोधी सदस्यांची संख्या पाहता सरकार विवादास्पद विधेयके मंजूर करून घेण्यावर जोर देते. असे करून ते दिलेल्या शब्दापासून पळ काढत आहे

नवी दिल्ली  - आज पार पडलेल्या राज्यसभेच्या कामकाजादरम्यान विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद व संसदीय कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. शुक्रवारी सभागृहात उपस्थित सदस्य संख्या पाहता केंद्र सरकार आपले कामकाज दामटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आझाद यांनी केला. यास नक्वी यांनी जोरदार आक्षेप घेतल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

शून्य काळात सरकारवर आरोप करताना आझाद म्हणाले, ""लंचब्रेकनंतर सभागृहात उपस्थित असलेल्या विरोधी सदस्यांची संख्या पाहता सरकार विवादास्पद विधेयके मंजूर करून घेण्यावर जोर देते. असे करून ते दिलेल्या शब्दापासून पळ काढत आहे.'' यावर नक्वी यांनी गैरहजर सदस्यांची उपस्थिती निश्‍चित करणे, हे आपले काम नसल्याचे स्पष्ट केले; जर खासगी कामकाज होणार नसेल, अशा स्थितीत कार्यक्रमपत्रिकेनुसार सरकारी कामकाज होऊ शकते, असे त्यांनी सर्वांच्या निदर्शनास आणून दिले.

शुक्रवारी लंचब्रेकनंतरची वेळ ही खासगी सदस्य व विधेयकांसाठी राखीव असते. पाच वाजण्यापूर्वी निर्धारित वेळेत जर का खासगी कामकाज झाले नाही तर अशावेळी कार्यक्रमपत्रिकेनुसार पुढील विषयाचे कामकाज घेण्याशिवाय सभागृहापुढे कोणताही पर्याय उपलब्ध नाही, असे उपसभापती पी. जे. कुरियन यांनी स्पष्ट केले.

Web Title: Sharp exchanges between Ghulam Nabi Azad, Mukhtar Abbas Naqvi