आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा शशी थरूर यांच्यावर आरोप

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 मे 2018

या विसंगत आरोपपत्राची मी दखल घेतली असून, याच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढा दिला जाईल. जो कोणी सुनंदाला ओळखत होता, त्याला ही गोष्ट माहीत आहे, की एकट्या माझ्या उकसवण्यावरून ती आत्महत्या करू शकत नाही. 
- शशी थरूर, कॉंग्रेस नेते 

नवी दिल्ली, ता. 14 (पीटीआय) : कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी त्यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी आज न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात करण्यात आला आहे. 

या प्रकरणात आरोप ठेवण्यात आलेली थरूर ही एकमेव व्यक्ती आहे. थरूर यांनी त्यांच्या पत्नीला क्रूरतेची वागणूक दिल्याचा आरोपही पोलिसांनी 3000 पानी आरोपपत्रात ठेवला आहे. पोलिसांनी पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी महानगर दंडाधिकारी धर्मेंद्र सिंह यांच्यासमोर आरोपपत्र दाखल केले. यावर 24 मे रोजी सुनावणी होणार आहे. थरूर यांना एक आरोपी म्हणून नोटीस बजावण्याची विनंतीही न्यायालयाला करण्यात आली आहे. 

17 जानेवारी 2014 रोजी एका हॉटेलमध्ये सुनंदा पुष्कर मृतावस्थेत आढळल्या होत्या. अनेक जोडपत्रांचा समावेश असलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे, की लोकसभेतील खासदार थरूर यांच्याशी विवाह झाल्यानंतर तीन वर्षे, तीन महिने आणि 15 दिवसांत पुष्कर यांचा मृत्यू झाला. 22 ऑगस्ट 2010 रोजी या दोघांचा विवाह झाला होता. 

या विसंगत आरोपपत्राची मी दखल घेतली असून, याच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढा दिला जाईल. जो कोणी सुनंदाला ओळखत होता, त्याला ही गोष्ट माहीत आहे, की एकट्या माझ्या उकसवण्यावरून ती आत्महत्या करू शकत नाही. 
- शशी थरूर, कॉंग्रेस नेते 

Web Title: Shashi Tharoor charged with abetment to suicide