शशिकलांच्या भीतीमुळेच अम्मांबाबत चुकीची माहिती 

पीटीआय
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी जयललिता यांच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जयललितांची प्रकृती सुधारत असल्याचे त्या वेळी इतर नेत्यांनी केलेली विधानेही खोटी होती, असा दावाही श्रीनिवासन यांनी केला. 

चेन्नई (पीटीआय) : शशिकला यांच्या भीतीनेच अण्णा द्रमुकचे नेते जयललिता यांच्या प्रकृतीबाबत चुकीची माहिती देत होते, असा दावा पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री दिंडिगल श्रीनिवासन यांनी आज केला. माजी मुख्यमंत्री जयललिता गेल्या वर्षी या रुग्णालयात असताना त्यांना कोणालाही भेटू दिले जात नव्हते, शशिकला यांचे नातेवाईक केवळ "त्या ठीक आहेत' इतकाच निरोप देत होते, असेही श्रीनिवासन यांनी सांगितले. 

श्रीनिवासन यांनी एका सार्वजनिक सभेमध्ये बोलताना जनता अणि अण्णा द्रमुकच्या सदस्यांची माफी मागितली. "शशिकला यांच्या भीतीमुळेच तुम्हाला अम्मांच्या प्रकृतीबाबत चुकीची माहिती द्यावी लागली. अम्मा इडली-सांबार खात असल्याचे, चहा पीत असल्याचे आम्ही तुम्हाला सांगत होतो. वास्तविक आम्ही त्यांना रुग्णालयात भेटू शकलो नव्हतो. आम्हाला माफ करा; मात्र आता परिस्थितीमुळे खरे बोलण्याची हिंमत आली आहे. जयललिता या अपोलो रुग्णालयात उपचार घेत असताना कोणत्या मोठ्या नेत्यालाही त्यांना भेटू दिले जात नव्हते. शशिकला यांचे नातेवाईकच प्रकृती ठीक असल्याचे सर्वांना सांगत होते,' असे श्रीनिवासन म्हणाले. जयललिता यांचे गेल्या वर्षी पाच डिसेंबरला निधन झाले होते. 

तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी जयललिता यांच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जयललितांची प्रकृती सुधारत असल्याचे त्या वेळी इतर नेत्यांनी केलेली विधानेही खोटी होती, असा दावाही श्रीनिवासन यांनी केला. 
 

Web Title: shashikala tamilnadu wrong information