Jama-Masjid-India
Jama-Masjid-India

किसी के बाप का हिंदुस्थान थोडी है?

देशात नवमुस्लिम उदयास येत आहेत. त्यांचा पेहराव मुस्लिमांसारखा आहे, पण ते देशभक्ती, राष्ट्रीयत्व, तिरंगा, राज्यघटना आणि राष्ट्रगीताप्रती प्रेम आज अभिमानाने मिरवत आहेत. हा देश लेखिका आणि कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांच्या ऋणात कायमस्वरूपी राहणार आहे. त्यांनी या देशाला माओवादी हिंसाचारातून एकहाती वाचवले. 'माओवादी हे हाती बंदूक असलेले गांधीवादी आहेत' असा उल्लेख त्यांनी केला आणि माओवाद्यांबद्दल या देशात असलेली उरली-सुरली सहानुभूती एका झटक्‍यात संपुष्टात आली. 

दिल्लीमधील सतराव्या शतकातील जामा मशिदीच्या पायऱ्यांवर जमलेल्या मुस्लिमांचा उल्लेख अरुंधती रॉय कसा करतील, असा विचार सहजच माझ्या मनात आला. येथे आंदोलन करणाऱ्या मुस्लिमांचा 'पेहराव' मुस्लिमांसारखा आहे. त्यांच्या हाती तिरंगा, राज्यघटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे छायाचित्र आहे. ते 'जन, गण, मन' गात आहेत आणि 'हिंदुस्थान झिंदाबाद', असे नारे देत आहेत.

डाव्या उदार मताप्रमाणे झेंडा, राष्ट्रगीत आणि राष्ट्रीयत्वाची चिन्हे अभिमानाने मिरविणे हे आक्रमक बहुसंख्यकांच्या राष्ट्रवादाचे प्रतीक मानले जाते. प्रजासत्ताकातील सगळ्यात मोठे अल्पसंख्य पवित्र अशा मशिदीपुढे येऊन ते प्रथम भारतीय असल्याचे सांगतात आणि राज्यघटनेवर आपली श्रद्धा असल्याचे सांगतात याचा अर्थ काय? त्यासाठी अधिक खोलवर जाऊन भारतात काय बदलले आहे याचा विचार करणे आवश्‍यक आहे. 

या देशातील मुस्लिम आता बहुसंख्यकांच्या देशप्रेमावरील पहिल्या हक्काच्या दाव्याला आव्हान देत आहेत. ब्रिटनमध्ये चार दशकांपूर्वी वंशवाद वाढीला लागल्यानंतर तेथील बहुतांश भारतीय स्थलांतरीत मुस्लिमांनी जशी भूमिका घेतली होती तशीच ते येथे घेत आहेत. ती म्हणजे, काहीही झाले तरी आम्ही येथेच राहणार आहोत. त्यांच्याशी कुणी झगडू शकत नाही. ठोस कारणाविना त्यांच्यावर कुणी गोळ्या झाडू शकत नाही. आपला देश बदलला आहे.

सध्याच्या भाषेत सांगायचे झाल्यास 'मेरा देश बदल गया है मित्रों!'. मुस्लिम म्हटले की कपडे, टोपी, बुरखा, हिजाब, हिरवा रंग आणि धार्मिक घोषणा असे पारंपरिक चित्र डोळ्यांपुढे उभे राहते. रागात असलेल्या मुस्लिमांसाठी आपल्या मनात 'एके-47', 'आरडीएक्‍स', 'मुजाहिदीन', 'लष्करे' अशी प्रतीके आहेत. अशा मुस्लिमांशी लढणे आणि त्यांचा निःपात करणे सहज शक्‍य आहे. जयपूरमधील स्फोटांसाठी अशा चार जणांना न्यायालयाने नुकतीच मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आहे. 

गेल्या तीन दशकांपासून आपली भीती एकच आहे ती म्हणजे मुस्लिमांमधील हताशपणाची भावना वाढून त्यांनी दहशतवादाचा मार्ग चोखाळल्यास कसे? सिमी ते इंडियन मुजाहिदीन यांसारख्या छोट्या गटांनी ही भीती खरी ठरवली आहे. डॉ. मनमोहनसिंग यांनीही 2009 च्या निवडणुकीच्या काळात ही भीती बोलून दाखवली होती. मुस्लिमांना 'खास' वागणूक दिली जात आहे, असे म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवायला हवे की एक टक्का मुस्लिमांना जरी असे वाटले की या देशात आपले भवितव्य नाही तरी स्थिती हाताबाहेर जाईल, असे ते म्हणाले होते. 

भारतीय मुस्लिमांच्या विरोधात जाणारे आणखी एक कारण आहे ते त्यांचे धर्मगुरू. जामा मशिदीचे बुखारी, मदानी आणि कुठल्याशा चॅनेलवर येऊन फतवे जारी करणाऱ्या दाढीधाऱ्यांनी काम आणखीनच बिघडवले आहे. हे एवढ्या संख्येने आहेत की कुठल्याची मुद्यावर विरोधात वा बाजूने बाजू मांडायला कुणी तरी पुढे येतेच. हे सारे आज बदलले नसले तरीही त्यातील बहुतांश नकारात्मकतेला आव्हान दिले जात आहे.

कलमाची जागा 'जन, गण, मन'ने घेणे, हिरव्या झेंड्याची जागा तिरंग्याने घेणे, काबा ऐवजी गांधी आणि आंबेडकरांच्या तसबिरी हाती येणे तसेच 'हिंदुस्थान झिंदाबाद'चे नारे लागणे असा बदल या चित्रात दिसू लागला आहे. एक गोष्ट मात्र बदलली नाही ती म्हणजे पेहराव. तथापि, मोठे बदल होत असताना पेहरावासारख्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे इष्ट ठरेल. 

'सभी का खून शामिल यहा की मिट्टी मे' 

केवळ जामा मशिदीच्या पायऱ्यांवरील चित्र बदलले म्हणजे सर्व काही उत्तम आहे, असा अर्थ होत नाही. जुन्या दिल्लीतील दरियागंज भागात मोटारीची जाळपोळ झाली आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरातमध्ये हिंसाचार उफाळून आला आहे. पश्‍चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळण्यासाठी ठिणगी पडायचा अवकाश आहे. असे असले तरीही दिल्लीतील मुस्लिमांनी जो बदल दाखवून दिला आहे, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

कारण त्यांच्यात नवमुस्लिमांचा उदय दिसून येत आहे. ज्यांना मुस्लिमांसारखे दिसण्याची तसेच आपले राष्ट्रीयत्व मिरवण्याची काही भीती नाही. हे चित्र बघून हिंदी कवी राहत इंदोरी यांच्या अजरामर ओळी आठवतात 'सभी का खून शामिल यहा की मिट्टी मे, किसी के बाप का हिंदुस्थान थोडी है?' 

(अनुवाद : किशोर जामकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com