पूर्वांचलातील आशा अन्‌ निराशा! 

purvanchal politics
purvanchal politics

उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील जनतेला त्यांच्या नरकयोग्य सहारा उपखंडीय सापळ्यातून बाहेर पडायचे आहे. मात्र, पंतप्रधानांसह अन्य राजकारण्यांना हे अद्याप उमगलेले दिसत नाही. 

अमेरिकेत काही विभाग "बॅडलॅंड' म्हणून गणले जातात. उत्तर प्रदेशातही काही विभाग यासाठी अहमहमिकेने पुढे येतील. यमुना नदीच्या खोऱ्यात धूप होण्याने निर्माण झालेला नापिक भाग आणि बुंदेलखंडमधील चंबळ, तसेच एटावा हे कायदा अस्तित्वात नसलेले विभाग अमेरिकेतील "बॅडलॅंड'शी तुलना करण्यायोग्य आहेत. आणखी पूर्वेकडे पाहिल्यास पाण्याच्या मुबलक उपलब्धतेमुळे हिरवळ आणि सुपीक जमीन दिसते. जेवढा जगण्याचा दर्जा घसरतो, तेवढा कायद्याचाही घसरतो. भरून चाललेली गटारे, खाली लोंबत असलेली वीजतारांची कोंडाळी, हवेतील कायमचा दर्प, खड्डे, अतिक्रमणे, कुपोषित मुले असे चित्र दिसते. येथे जपानी ज्वरामुळे दरवर्षी शेकडो मुलांचा मृत्यू झाल्याचे आपण ऐकतो. रस्त्याच्या कडेला कचऱ्याला कायमची जागा मिळाली आहे, कारण त्यात मोठ्या प्रमाणात असलेले प्लॅस्टिक. याच्या उलट गोरखपूरमधील उच्चभ्रू भागात शॉपिंग मॉल, रेस्टॉरन्ट असलेल्या ठिकाणी हा कचरा व्यवस्थित जमा करून रस्त्याच्या मध्ये ठेवलेला दिसतो. 
पूर्व उत्तर प्रदेशची गोरखपूर हे राजधानी असल्यासारखे आहे. हा भाग उत्तर प्रदेशातील सगळ्यात निराशाजनक भाग आहे. नेपाळची खुली सीमा आणि दुसरीकडे बिहारचा पश्‍चिम भाग आहे. राज्यातील आजूबाजूचे जिल्हेही आणखी वाईट परिस्थिती असलेले आहेत. गोरखपूरबाबत तुमची दोन मते बनतात. ही मते तुम्ही खाली पाहता की आकाशाकडे, यावर अवलंबून आहेत. तुमच्या पायाखाली सगळीकडे राडारोडा असतो, तर आजूबाजूला भिंतीवर खासगी उच्च माध्यमिक शाळा, इंग्रजी माध्यमांच्या शाळा, कोचिंग क्‍लासेस यांच्या जाहिराती दिसतात. भारतातील या छोट्या शहरात 1991 च्या सुधारणांनंतर शिक्षण ही सर्वांत महत्त्वाची विक्रीयोग्य वस्तू झाली आहे. पूर्वांचल किंवा पूर्व उत्तर प्रदेश यामुळे एका वेगळ्या आभासी जगात गेल्यासारखा वाटतो. येथील मोठी होर्डिंग्ज ही तुम्हाला तेथून दूर असलेल्या नोकऱ्यांचे आमिष दाखवितात. 
येथील सिव्हिल लाइन परिसरात रात्री फिरत असताना होर्डिंग्ज मोजली असता दोनशेपैकी 170 होर्डिंग्ज शिक्षण, प्रशिक्षण, कोचिंग, स्पर्धा परीक्षा, स्पोकन इंग्लिश क्‍लासेस याबाबत होती. एका होर्डिंगवर असे म्हटलेले असते, की तुम्हाला हिंदी येते म्हणजे इंग्रजीची गरज नाही का? दुसऱ्या होर्डिंगवर लिहिलेले असते, की आमच्या क्‍लासमधून मागील 18 वर्षांत पूर्वांचलमधील 1 हजार 12 डॉक्‍टर निर्माण झाले. पूर्वांचलमधील तरुणांना काय हवे असेल, तर येथून बाहेर पडणे. काही जण स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होतात आणि उरलेले उपनगरांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये रिक्षा ओढणे, बांधकाम मजुरी, हातगाड्यांवर भाज्या व फळे विकणे, चहाची टपरी चालविणे यांसारखी मोलमजुरीची कामे करतात. एकाही चित्रपट दिग्दर्शकाला येथील सहा कोटी भारतीयांवर "उडता पूर्वांचल' यासारखा चित्रपट बनवू वाटत नाही. येथील तरुणांना येथून उडून दुसरीकडेच जायचे आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगला वक्ता म्हणणे म्हणजे प्रेक्षकांना बांधून ठेवण्याच्या हुशारीला नाकारण्यासारखे आहे. लोकांना काय ऐकायचे आहे आणि आवाजाच्या कोणत्या पट्टीत, हे त्यांना नेमके माहीत असते. त्यांची देहबोलीही याच पद्धतीने कार्यरत असते. राहुल गांधी यांनी भूतकाळातील प्रचारसभांमध्ये पूर्वांचलाबाबत नेमके समजून घेण्यात चूक केलेली होती. राहुल यांच्याप्रमाणेच मोदी आर्थिक स्थलांतर हे विभागासाठी शाप असल्याचे म्हणतात. तुम्हाला तुमच्या तालुक्‍यातच नोकऱ्या हव्या आहेत का? तुम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज नाही, तुम्हाला कुटुंबीयांपासून दूर जाण्याची गरज नाही, असे मुद्दे ते उपस्थित करतात आणि प्रतिसादाची वाट पाहतात. त्यांनाही या वेळी पूर्वांचलमधील तरुणांच्या मनातील निराशेची नेमकी कल्पना नसते. येथील मुद्दा हा शिक्षण आणि नोकऱ्या एवढ्यापुरता मर्यादित नसून, येथील जीवनमानाच्या एकूण दर्जाबद्दल आहे. पावसाळ्यात खुली गटारे नाल्याचे स्वरूप धारण करतात. आजूबाजूला कायम असणारे डास तुम्ही चालताना मोबाईलवर बोलत असल्यास तोंडात जाण्याची भीती असते. सहारा उपखंडापेक्षा येथील स्थिती विदारक असल्याचे मोदी उत्तर प्रदेश सरकारचा दाखला देऊन ठासून सांगतात. 
काही विभागांना भौगोलिक रचनेतच शाप मिळालेला असतो. देशातील मुख्य रेल्वे आणि रस्त्यांच्या जाळ्यापासून गोरखपूर खूप दूर आहे. येथील लोक पूर्वीपासून हुशार, कठोर आणि बंडखोर होते. गोरखपूर आणि देवरिया यांच्या दरम्यान चौरी चौरा येते. येथे 1922 मध्ये जमावाने पोलिस ठाणे जाळले होते. यात 23 पोलिस ठार झाले होते. याच घटनेमुळे महात्मा गांधी यांनी पहिली असहकार चळवळ मागे घेतली होती आणि उपोषणास सुरवात केली होती. ब्रिटिशांनी "मार्शला लॉ' लागू करून दहशतीचे वातावरण निर्माण केले. नेहरू यांनी येथे येऊन याचा निषेध केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. आता 94 वर्षांनंतर ही परिस्थिती वेगळी दिसत आहे. क्रांतिकारी रामप्रसाद बिस्मिल यांना गोरखपूर कारागृहात फाशी देण्यात आली. आताचा विभाग हा आधीपेक्षा खूपच वेगळा आहे. 
क्रांतिकारकांची जागा माफियांनी घेतली. आता ब्राह्मण आणि राजपूत या मुख्य माफियांच्या टोळ्या संपल्या असून, अनेक छोट्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत, त्या नियमितिपणे सुुपारी घेऊन खून करण्याचे काम करतात. विशाल भारद्वाज यांच्या "इश्‍किया' चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि अर्शद वारसी गोरखपूरमध्ये लपलेले दाखविले आहे. वारसी म्हणतो, ""मामू आपण येथून जाऊ. भोपाळमध्ये फक्त शिया आणि सुन्नी संघर्ष असतो. येथे मात्र ठाकूर, यादव, जाट या सर्वांच्या खासगी सेना आहेत.'' पूर्वांचल अशाप्रकारे प्रसिद्धी पावून "बॅडलॅंड' ठरला आहे. 
सध्या या गोरखपूरचे सत्ताधारी पारंपरिक पद्धतीचे सरंजामदार अथवा माफिया नाहीत, ते आहेत ताकदवान आणि भगवे कपडेधारी योगी आदित्यनाथ. ते येथील गोरखनाथ मठाचे वंशपरंपरेने झालेले प्रमुख आहेत. येथून पाच वेळा ते निवडून गेले असल्याने ते भाजपला जिल्ह्यात चांगल्या जागा मिळवून देतील. या भागातील सर्वांत महत्त्वाचे आणि स्वच्छ ठिकाण हे त्यांचा मठ आहे. त्यांच्या वंशजांची छायाचित्रे लावलेल्या सभागृहात ते आपल्याशी संवाद साधतात. भाजपने मुस्लिम उमेदवार का दिला नाही? यावर ते म्हणतात, ""भाजपच्या यादीत मुस्लिम नाव नसले म्हणून काय झाले. येथे कधीही धार्मिक दंगल झालेली नाही. याला कारण आमचे सुशासन आणि भीती.'' भीती कोणाची आणि का? यावर ते प्रश्‍नच टाळतात. उत्तर प्रदेशचे छोट्या राज्यांमध्ये तुकडे करण्याचा मुद्दा काढल्यानंतर त्यांच्या डोळ्यांत चमक येते. यातील एक पूर्वांचल असू शकेल. आताच्या निवडणुकीत यासाठी वेळ नाही; मात्र पुढे भविष्यात आपणच या विभागाचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असणार, असे ते दर्शवितात. आता या परिस्थितीत अर्शद वारसीचा सल्ला कोण ऐकणार नाही. सगळे येथून बाहेर पडण्याच्याच मागे! 
(अनुवाद : संजय जाधव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com