शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होणार; ठाकरे गटाच्या खासदारांचा मोठा दावा : Shinde Vs Thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hearing on maharashtra power struggle  shivsena supreme court constitution bench Uddhav Thackeray vs Eknath shinde

Shinde Vs Thackeray: शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होणार; ठाकरे गटाच्या खासदारांचा मोठा दावा

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. यामध्ये शिवसेनेच्या १६ आमदारांचा अपात्रतेच्या मुद्द्यावर सुनावणी होत आहे. दरम्यान, शिंदे गटाचे हे १६ आमदार अपात्र होणार, असा दावाच ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी केला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला आहे. (Maharashtra Politcs 16 MLAs of Shinde faction to be disqualified a big claim by MP Anil Desai)

"शिंदे गटाच्या आमदारांच्या कृती या पक्षविरोधी कारवाया असल्याचं सरळसरळ स्पष्ट होतं आहे. घटनेच्या १० व्या शेड्युलनुसार त्यांचं स्वेच्छेनं प्राथमिक सदस्यत्व सोडल्याचं यातून दिसतं. त्यामुळं त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झालीच पाहिजे. जर ती झाली नाही तर मग बाकीच्या घटना एकत्रित करुन दाखवता येणार नाहीत. कारण कायद्याची अंमलबजावणी ही त्या त्या घडामोडींप्रमाणं होणं अपेक्षित आहे आणि आमचा कोर्टावर विश्वास आहे. त्यामुळं या कायद्याची अंमलबजावणी होणार आणि १६ आमदार अपात्र ठरणार," असं देसाई यांनी ठामपणे म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात आज तिसऱ्या दिवसाची सुनावणी काही वेळातच सुरु होणार आहे. पहिल्या दोन्ही दिवशी शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्हींच्या वकिलांनी युक्तीवाद केला. दुसऱ्या दिवशी राज्यपालांच्यावतीनं देखील वकिलांनी आपली बाजू मांडली.

कोर्टात दोन दिवसांत काय घडामोडी घडल्या?

या दोन दिवसांत अरुणाचल प्रदेशातील नबाम रेबिया प्रकरणाचा दाखला या सुनावणी दरम्यान सुरुवातीपासून देण्यात येत आहे. या प्रकरणात अरुणाचल प्रदेशात २२ आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली होती. पण यामध्ये शिंदे गटाच्या वकिलांनी शिंदे गट हा वेगळा गट नसून मूळ शिवसेनाच असल्याचा युक्तीवाद केला. तर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाच्या आमदारांविरोधात पक्षांतराचा मुद्दा लावून धरला आहे. त्याचबरोबर आजच्या तिसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंचा राजीनामा हा मुद्दाही यावेळी कळीचा ठरण्याची शक्यता आहे. तसेच ही सुनावणी ७ सदस्यांच्या खंडपीठाकडं जाईल का? हे ही निश्चित होऊ शकेल.