Narendra Modi : नरेंद्र मोदींचा समांतर संवाद! shital pawar writes Narendra Modi government Parallel communication bjp politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP

Narendra Modi : नरेंद्र मोदींचा समांतर संवाद!

काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता - मुझे चलते जाना है ! या गाण्याची चाल असलेला आणि नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीची जाहिरात करणारा हा व्हिडिओ होता. विरोधकांच्या कोणत्याही टीकेला थेट उत्तर न देऊन केवळ आपल्या ‘नॅरेटिव्ह’वर लक्ष केंद्रित करून जनमत आपल्या बाजूने वळविण्यात मोदी आणि भाजपला लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर यश मिळाल्याचा नजीकचा इतिहास आहे. तीच मांडणी या व्हिडिओत होती. विरोधक सातत्याने मोदींच्या संवाद पद्धतीवर टीका करत असले तरी ‘सातत्याने संवाद’ हेच मोदींच्या संवादातून साधलेल्या लोकप्रियतेचं सूत्र आहे.

माध्यमांची भूमिका निर्विवाद महत्त्वाची आहेच; पण नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारने समांतर माध्यमं उभी करण्यावर सर्वाधिक भर दिला. यामध्ये समाजमाध्यमांचा वापर तर आहेच शिवाय आकाशवाणीवर प्रसारित होणारी मोदींचा 'मन की बात' सारखा उपक्रमही. हे सर्व करत असतांना डिजिटायझेशनवर देण्यात आलेला भर ही भाजपची सुरुवातीपासूनची जमेची बाजू. उदाहरणार्थ दिवंगत नेत्या सुषमा स्वराज किंवा अगदी अलीकडच्या काळातील पियुष गोयल किंवा एस. जयशंकर. मंत्र्यांनी ट्विटरवरून नागरिकांचे प्रश्न सोडवून लोकांना समाजमाध्यमांवर विशिष्ट प्रकारे व्यक्त होण्याची सवय लावली. परिणामी समाजमाध्यमांची राजकीय संवादात विश्वासार्हता वाढली.

‘मन की बात’ सारखा उपक्रम सर्वांपर्यंत नेताना रेडिओसारख्या सर्वांना परवडेल अशा माध्यमाची निवड ते संपूर्ण उपक्रम जनतेशी संवाद आणि सामाजिक उपक्रमाभोवती बांधून मोदींनी संवाद उपक्रमाचा नवीन विक्रम प्रस्थापित केला.

‘ब्रँड मोदी’

भाजपच्या बऱ्या-वाईट संवाद पद्धतीबद्दल नेहमीच चर्चा होते. २०१४ च्या निवडणुकीत या पद्धतीने ‘मोदी’ ब्रँड बनवला आणि निकाल आपल्यासमोर होते. या ‘ब्रँड’ बद्दल अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात मांडणी झाली आहे.

लोकसभा निवडणुकीची चर्चा करतांना निर्विवादपणे नरेंद्र मोदी हेच भाजपचा चेहरा राहिले. त्यामुळे पक्षाकडून होणारा सर्व संवाद आणि मांडणी मोदींभोवती असणे अपेक्षित आहे. पण लेखक नलीन मेहता यांनी मांडलेल्या ‘नारद इंडेक्स’नुसार भाजपच्या संवाद पद्धतीत केवळ मोदी यांच्या प्रचारावर भर नाही तर, विरोधकांवर आक्रमक टीका हाही मुद्दा महत्त्वाचा राहिला आहे. वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारावर मेहता मांडतात की भाजपचा पक्षाबाहेर होणारा सर्वाधिक संवाद काँग्रेसवर टीकेचा आहे.

भाजपच्या प्रचारात नेहमीच ‘विकास’ शब्दाभोवती सर्वाधिक मांडणी झाल्याचे हे संशोधन सांगते. मोदींच्या लोकप्रिय प्रतिमेचा उपयोग करून भाजप विरोधकांची कोंडी करते, असाही दावा मेहता यांच्या संशोधनाने केला आहे. यापेक्षा थोडी वेगळी मांडणी लेखक आकार पटेल करतात. आपल्या ‘प्राइस ऑफ मोदी इअर्स’ या पुस्तकात लिहितात की ‘ब्रँड’ बनवितांना भाजपने कुठेही सरकारची कामगिरी, जबाबदारी आणि दिलेल्या आश्वासनांची पूर्तता याबद्दल मांडणी केलेली नाही. विरोधी पक्ष आणि माध्यमही याबाबत पुरेसे आक्रमक नाहीत. बौद्धिक वर्गातल्या या चर्चा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचताना मात्र त्याचे वेगवेगळे परिणाम दिसून येतात. त्यात सध्यातरी भाजपची संवादशक्ती इतर पक्षापेक्षा सरस ठरते आहे.

एकीकडे आमचा आवाज दाबला जातोय, माध्यमांशी थेट चर्चा करत नाहीत, असे विरोधकांचे मोदींवर आरोप सुरु आहेत. दुसरीकडे ‘मन की बात’ सारख्या संवाद उपक्रमाचे १०१ भाग यशस्वीरीत्या पूर्ण होतात. या सगळ्यांमध्ये विरोधाभास वाटत असला तरी माध्यमांचा उपयोग हा आपला संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी असतो, हे सूत्र लक्षात घेतलं तर मोदींचे ‘दिसणं’ कुठेही कमी झालेले नाही. स्वतःच्या समांतर यंत्रणेतून लोकांशी थेट संवाद साधण्यात मोदी यशस्वी होत आहेत, असे चित्र घेऊन आपण आगामी लोकसभा निवडणुकांना सामोरे जाणार आहोत.

माध्यमांमध्ये हे महत्त्वाचं

तुमचा लक्ष्य गट कोणता आणि त्याच्या जिव्हाळ्याचा विषय तुम्ही त्याच्यापर्यंत कसा नेताय याला माध्यमांमध्ये महत्त्व असतं. नेमकं हेच मोदींच्या संवादात आढळतं. तसंच पक्ष यंत्रणेतून मेसेज अधिकाधिक लोकांपर्यंत थेट पोचविण्याचे नियोजन भाजपकडून सातत्यानं होत असतं. शीर्ष नेतृत्वाने निश्चित केलेला मेसेज अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपची पक्ष यंत्रणा आणि त्यामध्ये आणलेले डिजिटायजेशन महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामध्ये सरल अॅपसारख्या नवतंत्रज्ञानाचाही समावेश आहे.