गोव्यात शिवसेना, मगो व गोवा सुरक्षा मंचाची युती

अवित बगळे
मंगळवार, 10 जानेवारी 2017

विशेष म्हणजे भाजप मगोच्या युतीची घोषणा फेब्रुवारी 2012 मध्ये पणजीतील सर्वात जून्या अशा हॉटेल मांडवीच्या पाचव्या मजल्यावरील ज्या परिषद सभागृहात झाली होती, त्याच सभागृहात आज ही घोषणा करण्यात आली.

पणजी - गोव्यात सत्ताधारी भाजपविरोधात विधानसभा निवडणूक लढण्यासाठी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (मगो), गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेनेची युती आज (मंगळवार) आकाराला आली. युतीचे समन्वयक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते सुभाष वेलिंगकर यांनी आज युतीची घोषणा केली. गोव्यात 4 फेब्रुवारीला 40 जागांच्या विधानसभेसाठी मतदान असून 11 मार्चला मतमोजणी आहे.

विशेष म्हणजे भाजप मगोच्या युतीची घोषणा फेब्रुवारी 2012 मध्ये पणजीतील सर्वात जून्या अशा हॉटेल मांडवीच्या पाचव्या मजल्यावरील ज्या परिषद सभागृहात झाली होती, त्याच सभागृहात आज ही घोषणा करण्यात आली. यावेळी मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर, गोवा सुरक्षा मंचाचे अध्यक्ष आनंद शिरोडकर, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, शिवसेनेचे राज्यप्रमुख शिवप्रसाद जोशी आदी उपस्थित होते. युतीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून सुदिन ढवळीकर यांच्या नावाची घोषणाही वेलिंगकर यांनी केली.

भाजपसोबत मगो सत्तेत असतानाच वेलिंगकर यानी मगो सत्तेतून बाहेर येईल व गोवा सुरक्षा मंचासोबत युती करेल अशी घोषणा केली होती. त्यांनी भाजपमध्येही उभी फूट पडेल असे भाकीत वर्तवले होते मात्र तसे अद्याप झालेले नाही. ही युती सत्तेत आल्यावर 2011 साली कॉंग्रेस सरकारने सुरु केलेले आणि त्यानंतर भाजप युती सरकारने सुरु ठेवलेले इंग्रजी प्राथमिक शाळांचे अनुदान बंद करू असे आश्‍वासन यावेळी देण्यात आले.
मगो भाजपसोबत निवडणुकोत्तर युती करणार नाही असे सांगण्यास यावेळी सुदिन ढवळीकर यांनी नकार दिला. राजकारणात त्या त्या वेळी परिस्थितीनुरुप निर्णय घ्यावे लागतात. जनता यावेळेला आम्हाला बहुमत देईल यामुळे तो प्रश्‍न उद्‌भवणार नाही असे सांगत त्यानी हा विषय गुंडाळण्याचा प्रयत्न केला. वेलिंगकर यांनी मात्र ठामपणे भाजपशी निवडणुकोत्तर युती होणार नाही असे सांगितले. शिवसेनेचे संजय राऊत यांनीही भाजपसोबत नंतर युती नाही असे सांगितले.

ही युती 40 पैकी 37 जागा लढवणार आहे. शिवसेनेच्या वाट्याला साळगाव, थिवी, मुरगाव आणि कुंकळ्ळी असे चार मतदारसंघ आले असून गोवा सुरक्षा मंच शिवोली, पणजी, मये, साखळी, कुडचडे आणि वेळ्ळी असे 6 मतदारसंघ लढवणार आहे. उर्वरीत 27 मतदारसंघात मगो आपले उमेदवार ठेवेल वा अन्य उमेदवारांना पाठींब्याच्या निर्णय घेईल.

Web Title: Shiv Sena, Goa Suraksha Manch and Maharashtra Gomantak paksha join hands to contest assembly election