'सावरकरांना भारतरत्न द्या'; भाजप अगोदर शिवसेनेचीच मागणी

veer-Savarkar
veer-Savarkar

नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदार सावरकर यांना भारतरत्न द्या, अशी मागणी शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी लोकसभा सभागृहात केली. 

सध्या राजधानी दिल्लीत लोकसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दुपारच्या सत्रात बोलताना खासदार गावित म्हणाले, अध्यक्ष महोदय, बिरसा मुंडा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोघांना भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात यावा, अशी मी मागणी करतो. 

मंगळवारी (ता.19) स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यात यावा अशी शिफारस करण्यात आली होती. मात्र, यासाठी कोणतीही शिफारस गरजेची नाही, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिलं होतं. यंदा पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात सावरकरांना भारतरत्न देण्यात यावा, याचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळी भाजप-शिवसेना हे एकत्र निवडणूक लढवत होते. मात्र, सत्तावाटपावरून वाद निर्माण झाल्याने शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्यात आलं आहे. सध्या सेना विरोधी बाकांवरून आपल्या मागण्या मांडत आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रात सत्ता वाटपावरून भाजप-शिवसेनेत काडीमोड झाल्यानंतर सत्तास्थापनेचा खेळ रंगला होता. मात्र, कोणत्याही मुद्द्यावर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षात एकमत न झाल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सत्ता स्थापनेला अनुकूल वातावरण निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे. 

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. पण काँग्रेसचा याला विरोध होता. आता राज्यात काँग्रेसने शिवसेनेशी सूत जुळवून घेतले असल्यामुळे हा विरोध काहीसा मावळला आहे. मात्र, केंद्रात शिवसेनेच्या या मागणीला काँग्रेस हिरवा कंदील दाखवणार का? याची उत्सुकता सावरकर प्रेमींना लागून राहिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com