खासदार गायकवाड यांचा घरी परतण्यासाठी रेल्वेने प्रवास

वृत्तसंस्था
शनिवार, 25 मार्च 2017

एअर इंडियाच्या आर. सुकुमार या संबंधित अधिकाऱ्याने खासदार गायकवाड यांचे वर्तन "सडकछाप' होते, असे सांगून त्यांच्याविरुद्ध पोलिस कारवाईच झाली पाहिजे, असे ठामपणे सांगितले आहे.

नवी दिल्ली - एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण करणारे शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांना विमान कंपन्यांनी काळ्या यादीत टाकल्यानंतर त्यांनी घरी परतण्यासाठी रेल्वेने प्रवास करावा लागला. 

खासदार गायकवाड यांना फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सने (एफआयए) पाच कंपन्यांच्या विमानांत त्यांना तिकीटच न देण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. यामुळे आता रेल्वेने प्रवास करण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्यासमोर उरला नाही. खासदार गायकवाड हे रात्री दिल्लीहून ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेस या रेल्वेने मुंबईत आले. प्रवासादरम्यान कोटा रेल्वे स्थानकावर पत्रकारांशी त्यांची वादावादी झाल्याचेही वृत्त आहे. गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल झाल्याने त्यांना अटक होण्याचीही शक्‍यता आहे. 

एअर इंडियाच्या आर. सुकुमार या संबंधित अधिकाऱ्याने खासदार गायकवाड यांचे वर्तन "सडकछाप' होते, असे सांगून त्यांच्याविरुद्ध पोलिस कारवाईच झाली पाहिजे, असे ठामपणे सांगितले आहे. गायकवाड यांनी आपल्याला मारहाण केली व विमानाच्या दारातून खाली ढकलून देण्याचा प्रयत्न केला. मारहाण करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे, अशी कोणाची समजूत होऊ नये, यासाठी गायकवाड यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे या कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे.

Web Title: Shiv Sena MP Ravindra Gaekwad takes train home