कर्नाटकमधील शपथविधीचे उद्धव ठाकरेंना निमंत्रण

वृत्तसंस्था
बुधवार, 23 मे 2018

आज कर्नाटकमध्ये होत असलेल्या शपथविधीसाठी देवेगौडा यांनी उद्धव ठाकरे यांना दूरध्वनीवरून निमंत्रण दिले. मात्र, पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज त्यांच्या प्रचारसभा असल्याने ते शपथविधीला जाऊ शकत नाहीत.

बंगळूर : कर्नाटकमध्ये आज (बुधवार) धर्मनिरपेक्ष दलाचे (जेडीएस) मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचा शपथविधी होणार असून, या शपथविधीला देशभरातील भाजप विरोधक एकवटणार आहेत. या शपथविधीसाठी माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनाही  निमंत्रण दिले आहे. 

याविषयी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे, की आज कर्नाटकमध्ये होत असलेल्या शपथविधीसाठी देवेगौडा यांनी उद्धव ठाकरे यांना दूरध्वनीवरून निमंत्रण दिले. मात्र, पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज त्यांच्या प्रचारसभा असल्याने ते शपथविधीला जाऊ शकत नाहीत. आम्ही शपथविधीला जाणार नसलो तरी आमच्याकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. 

कर्नाटकचे 25 वे मुख्यमंत्री म्हणून एच. डी. कुमारस्वामी आज (ता. 23) शपथ घेणार आहेत. शक्तीसौध विधानसौधच्या समोर सायंकाळी 4.30 वाजता होणाऱ्या शपथविधीचा समारंभ होणार आहे. देशातील विविध पक्षांचे प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अन्य नेते उपस्थित असतील. या कार्यक्रमासाठी 80 बाय 40 फुटांचे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून, शिवाय सुमारे एक लाखापेक्षा अधिक लोकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: Shiv Sena received invitation to HD Kumaraswamy's swearing ceremony