लोकसभेत भाजपला मित्रांचा झटका 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 3 जानेवारी 2019

26 खासदारांचे निलंबन 
लोकसभेत गोंधळ घालून कामकाजात अडथळा आणणाऱ्या अण्णा द्रमुकचे 24 आणि तेलुगू देसमचे दोन अशा 26 खासदारांना लोकसभेच्या सभापतींनी पाच दिवसांसाठी निलंबित केले आहे. 

नवी दिल्ली : "राफेल' प्रकरणात कॉंग्रेसचे आरोप फेटाळण्यासाठी भाजपला एनडीएमधील मित्रपक्षांच्या मदतीची नितांत गरज असताना शिवसेनेने जेपीसीची मागणी करून जोरदार झटका दिला, तर नेहमी सरकारची पाठराखण करणाऱ्या बिजू जनता दलानेही (बीजेडी) पारदर्शकतेचा हवाला देत "राफेल' व्यवहारावर हल्ला चढवून अडचण वाढविली आहे. 

लोकसभेत "राफेल' प्रकरणावरील चर्चेदरम्यान शिवेसनेची भूमिका मांडताना खासदार अरविंद सावंत यांनी अनिल अंबानींचा संदर्भ देत एकापाठोपाठ एक शालजोडीतले फटके लगावले. राहुल गांधींनी अंबानींचा "डबल ए' असा उल्लेख केला होता. तोच धागा पकडून सावंत यांनी "पंतप्रधानांनीच डबल एला फ्रान्समध्ये सोबत नेले होते. कंपनी कागदावर असताना ऑफसेट कंत्राट मिळत असेल, तर यामध्ये कुणाची तरी मध्यस्थता नक्कीच असेल,' असा सवाल केला. यामुळे सत्ताधाऱ्यांचे चेहरे पडले होते.

कॉंग्रेसचे खासदार सावंत त्यांची पाठराखण करत होते. "आपले सरकार अच्छे आहे, लुच्चे नाही. जेपीसीला घाबरण्याची गरज नाही. जेपीसी मंजूर करा आणि टीकाकारांची तोंडे बंद करा,' अशी मागणी सावंत यांनी करताच कॉंग्रेसच्या अन्य खासदारांसोबतच यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधींनीही शिवसेनेच्या मागणीचे बाके वाजून स्वागत केले. तत्पूर्वी, बिजू जनता दलाचे कालिकेश सिंगदेव यांनीही सरकारला आडवळणाने लक्ष्य केले. "राफेल'ची नेमकी किंमत किती आहे हा प्रश्‍न अनुत्तरित आहे. विमाने नऊ टक्‍क्‍यांनी स्वस्त आहेत हे अर्थमंत्री अरुण जेटली कशाच्या आधारे सांगत आहेत, यूपीए सरकारचा करार का रद्द केला, "मिग' विमाने बनविणाऱ्या "एचएएल'ला "राफेल' निर्मितीमध्ये कसली अडचण आली, याची उत्तरे मिळायला हवीत. "राफेल' विमाने घेताना तंत्रज्ञानाचे हस्तांतर का वगळण्यात आले, यावर सरकारने श्‍वेतपत्रिका आणावी, अशीही मागणी सिंगदेव यांनी केली. तृणमूल कॉंग्रेसचे सौगत रॉय यांनीही सरकारला झोडपताना ढगाआड दडून लढणाऱ्या रावणपुत्र मेघनादाप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी अरुण जेटली यांच्या मागे दडत आहेत, असा टोला लगावला. त्यांच्या भाषणादरम्यानच "तृणमूल'चे खासदार कल्याण बॅनर्जी आणि भाजप खासदार ब्रजभूषण सिंह यांच्यात जोरदार हमरीतुमरीही झाली. 

26 खासदारांचे निलंबन 
लोकसभेत गोंधळ घालून कामकाजात अडथळा आणणाऱ्या अण्णा द्रमुकचे 24 आणि तेलुगू देसमचे दोन अशा 26 खासदारांना लोकसभेच्या सभापतींनी पाच दिवसांसाठी निलंबित केले आहे. 

इतरांना चोर म्हणून आपली चोरी लपू शकत नाही. 
- अरविंद सावंत, शिवसेनेचे खासदार 

Web Title: ShivSena BJD MPs attack on BJP for Rafale deal