काश्मीरची समस्या पाकिस्तानात नसून आपल्याच देशात : शिवसेना

article
article

मुंबई :  काश्मीरचे नेते म्हणवून घेणाऱ्या फारुख अब्दुल्लांसारख्या लोकांनी 370 कलम हटविण्यास फक्त विरोध केला नाही, तर फुटून निघण्याची अप्रत्यक्ष भाषा केली. मेहबुबा मुफ्ती यांच्या मनात तर हिंदुस्थानविषयी द्वेष उफाळतच असतो. हे असे नेतेच काश्मिरी जनतेचे दुष्मन आहेत. कश्मीरला खरा धोका पाकिस्तानपासून नसून या नेत्यांपासून आहे. पाकिस्तानी सापाचा फणा मोदी यांनी ठेचला आहे. आता या विंचवांच्या नांग्या मोडा!, असे आवाहन शिवसेनेने केले आहे.

भाजप सरकारने लोकसभा निवडणुकीवेळी काश्मीरमधून 370 कलम हटविण्याची घोषणा केली होती. त्यानंतर काश्मीरमधील नेत्यांकडून त्याला विरोध होत आहे. याच विषयावर शिवसेनेने आज (गुरुवार) अग्रलेखाच्या माध्यमातून भाष्य केले आहे.

शिवसेनेने म्हटले आहे, की जम्मू-कश्मीरची समस्या ही पाकिस्तानात नसून प्रत्यक्ष आपल्या देशात आहे. जम्मू-कश्मीरात राष्ट्रपती राजवटीची मुदत सहा महिने वाढवण्यात आली. पुढील सहा महिन्यांत खोऱ्यातील वातावरण ठीकठाक केले जाईल. अमरनाथ यात्राही सुरू झाली आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर ताण आहे. त्यानंतर विधानसभा निवडणूक होईल. काश्मीरातील मुख्य मुद्दा निवडणुका नसून 370 कलम हटवणे हा आहे. या कलमाने कश्मीरला जो विशेष दर्जा दिला आहे तो हिंदुस्थानचे स्वातंत्र्य आणि अखंडतेस छेद देणारा आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत ठणकावून सांगितले की, ‘370 कलमाची व्यवस्था तात्पुरती आहे.’ याचा दुसरा अर्थ असा की, मोदी राजवट दिलेल्या शब्दास जागेल. दिल्लीत मोदींचे राज्य आहे. कश्मीरात शांतता विकत घेण्याचे दिवस संपले. आता दहशतवाद व धमक्यांना भीक न घालणारे सरकार आले. कश्मीरला गेल्या साठ-सत्तर वर्षांत देशाने भरपूर दिले. 

आपण हिंदुस्थानात राहतो म्हणजे तुमच्यावर मोठे उपकारच करतो ही भावना आधी मोडून काढायला हवी. पाकिस्तान हा कंगाल झालेला देश. आता त्यांच्या कटोऱ्यात कुणी भीक टाकायला तयार नाही. दिवाळखोरी हेच त्यांचे भवितव्य आहे. तेथील जनता नरकयातना भोगत आहे. हे काय आमच्या कश्मीरातील लोकांना कळत नसावे? ते येथेच सुखात आहेत. मोदी आल्यापासून व आधीही हजारो कोटींची विकासकामे जम्मू-कश्मीरात होत आहेत ती कुणासाठी? रोजगार हवा असेल तर तेथे उद्योग आला पाहिजे, पर्यटन व्यवसाय सुरळीत पार पडला पाहिजे. शांतता नांदायला हवी, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com