'काश्मिरमध्ये काय होणार हे मोदी व शहाच सांगू शकतील'

Shivsena
Shivsena

पुणे : अमरनाथ यात्रेच्या आधी गृहमंत्री अमित शहा श्रीनगरला जाऊन आले. गेल्या पंचवीस वर्षांचा इतिहास असे सांगतो की, जेव्हा जेव्हा गृहमंत्री कश्मीरात पोचले त्या त्या वेळी अतिरेकी व फुटीरतावाद्यांनी बंद पुकारून गृहमंत्र्यांचे स्वागत केले. अमित शहा गृहमंत्री म्हणून श्रीनगरात गेले तेव्हा असा बंद वगैरे पुकारला गेला नाही. हे आशादायक लक्षण होते. सध्या कश्मीरात वेगाने घडामोडी घडताना दिसत आहेत. सरकार नक्की कोणती पावले उचलणार आहे याबाबत कमालीची गोपनीयता आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.

काश्मीरबाबत पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा काय निणर्य घेणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. ‘35-ए’ हटवतात की 370 कलम हटवून कश्मीर खऱ्या अर्थाने भारताच्या नकाशावर आणतात याविषयी उत्सुकता आहे. कश्मीरध्ये सध्या 144 कलम लागू कऱण्यात आले आहे. तसेच आज सकाळी मंत्रीमंडळाची काश्मीरबाबत महत्त्वाची बैठक देखील हाेणार आहे. मात्र या घडणाऱ्या घडामाेडींबाबत काश्मीरात नक्की काय होणार हे पंतप्रधान मोदी व शहाच सांगू शकतील, असे शिवसेनेने मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून काश्मीरमधील परिस्थितीविषयी भाष्य केले आहे.  

शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे, की सध्या दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने मोदी सरकारने अमरनाथ यात्रा मध्येच थांबवली आहे. यात्रेसाठी पोचलेल्या हजारो हिंदू यात्रेकरूंनी परत फिरावे असे आदेश सरकारतर्फे देण्यात आले. आपल्याच देशाच्या भूमीवरून आपल्याच नागरिकांना परत फिरण्याचे हे आदेश आहेत. असे आदेश का दिले गेले हे येणारा काळच सांगू शकेल. गेल्या आठवडय़ात कश्मीरात 10 हजार जादा सैनिकांची कुमक पाठविण्यात आली. आता पुन्हा 28 हजार जवान पाठवून त्यांना वेगवेगळय़ा भागात तैनात केले आहे. मेहबुबा मुफ्ती यांना अशी भीती वाटते की, जम्मू-कश्मीरमधून ‘35-ए’ कलम हटवायच्या हालचाली सुरू असून त्यासाठीच इतका फौजफाटा कश्मीरात उतरवला आहे. ‘35-ए’ कलम हे कश्मीरला भारतापासून तोडणारे, इतर राज्यांपेक्षा वेगळा दर्जा देणारे कलम आहे. 370 कलमापेक्षा ते घातक आहे. त्यामुळे हे कलम हटवणे गरजेचे आहे व मोदी सरकारचे ते कर्तव्य आहे, पण मेहबुबा मुफ्ती यांनी अशी धमकी दिली आहे की, ‘35-ए’ कलमास हात लावणाऱयांचे हात जाळून टाकू. कश्मिरी जनतेने बलिदानास तयार राहावे अशी चिथावणीची आणि बंडाळीची भाषा करून देशाला आव्हान दिले आहे. आता काश्मीरमध्ये पुढे घडणाऱ्या घटनांचे दुरगामी परिणाम देशावर हाेणार हे मात्र निश्चित आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com