कोलकत्यात पडला चक्क पैशांचा पाऊस!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

- खासगी कंपनीच्या कार्यालयातून फेकल्या नोटा 

कोलकता : कोलकत्यातील एका इमारतीमधून चक्क पैशांचा पाऊस पडला. अचानक हवेत उडणाऱ्या दोन हजार, 500 आणि 100 रुपयांच्या नोटा पाहून तेथे उपस्थित असलेले आश्‍चर्यचकित झाले होते. 

नोटांच्या पावसाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शहरातील एका इमारतीमधील सहाव्या मजल्यावरील खासगी कंपनीच्या कार्यालयातून बुधवारी (ता. 20) झाडूने नोटा खिडकीतून खाली लोटण्यात आल्या. महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) अधिकारी या कार्यालयात छापा घालण्यासाठी आले होते, त्याच वेळी पैशांचा पाऊस पाडण्यात आला. सुरवातील सुट्या नोट्या आणि नंतर नोटांची बंडलेच खाली फेकण्यात आली. साधारण आठ ते दहा लाख रुपये अशा पद्धतीने टाकण्यात आले. कंपनीतील कर्मचारी नोटा गोळा करीत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

आयात-निर्यातीचा व्यवसायाशी संबंधित या कंपनीने जकात चुकविल्याने छापा घालण्यासाठी "डीआरआय'चे कर्मचारी पोचले होते, असे सांगण्यात आले. त्यानंतर सक्तवसुली संचालयानाचे अधिकारीही तेथे पोचले. त्यांनी या कंपनीची झडती घेतली. मात्र हा छापा आणि नोटा फेकण्याचा काही संबंध आहे का, हे अद्याप निश्‍चित समजलेले नाही.

या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कंपनी कोणाच्या मालकीची आहे, छापा घालणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या व त्यातून किती रक्कम जप्त करण्यात आली हे गुलदस्तात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shower Of Currency Notes From Building In Kolkata