Hyderabad Murder Case: हैद्राबादमध्येही घडलं श्रद्धा वालकरपेक्षा भयानक हत्याकांड, प्रेयसीचे तुकडे करुन चक्क... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hyderabad Murder Case

Hyderabad Murder Case: हैद्राबादमध्येही घडलं श्रद्धा वालकरपेक्षा भयानक हत्याकांड, प्रेयसीचे तुकडे करुन चक्क...

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती आता हैदराबादमध्ये झाली आहे. एका व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे दगड कापण्याच्या मशीनने तुकडे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याची घटना समोर आली आहे.

एका खून प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांच्या तपासात हा खळबळजनक खुलासा झाला आहे. पोलिसांनी सांगितलेल्या माहिती नुसार, आरोपीने मृताचे पाय आणि हात त्याच्या घराच्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले होते आणि दुर्गंधी येऊ नये म्हणून जंतुनाशक आणि परफ्यूम फवारले होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

17 मे रोजी हैदराबाद पोलिसांना शहरातील मुसी नदीजवळ एका हत्येची माहिती मिळाली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता बुधवारी एक धक्कादायक प्रकार समोर आला. 48 वर्षीय आरोपी चंद्र मोहनचे 55 वर्षीय कृतिका याराम अनुराधा रेड्डीसोबत गेल्या 15 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पतीपासून विभक्त झालेली ही महिला चंद्र मोहनसोबत त्याच्या चैतन्यपुरी कॉलनी, दिलसुखनगर येथील घरी राहत होती.

कृतिका 2018 पासून व्याजावर पैसे देण्याचा व्यवसाय करत होती. आरोपीने मयताकडून ऑनलाइन व्यवसाय करण्यासाठी सात लाख रुपये घेतले होते आणि या पैशावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. महिलेने पैशासाठी दबाव टाकल्याने तिचा राग मनात धरून तिची हत्या करण्याचा कट रचला. 12 मे रोजी आरोपीने घरी भांडण करून तिच्यावर चाकूने हल्ला केला, तिच्या छातीवर आणि पोटावर वार केले यात तिचा मृत्यू झाला.

हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी दोन लहान दगड कापण्याची मशीन खरेदी केली. धडापासून डोके कापून काळ्या पॉलिथिनच्या आवरणात ठेवले. त्यानंतर तिचे पाय आणि हात वेगळे करून फ्रीजमध्ये ठेवले.

१५ मे रोजी आरोपीने मृताचे शीर एका रिक्षातून मुशी नदीजवळ आणून तेथे फेकले. आरोपी फिनाइल, डेटॉल, अत्तर अगरबत्ती आणि कापूर आणून केलेल्या अवयवांच्या तुकड्यांवर नियमितपणे शिंपडत होता जेणेकरून आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरू नये. ऑनलाइन व्हिडिओ पाहून शरीराच्या अवयवांची विल्हेवाट लावण्याच्या पद्धती त्यांनी पाहिल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो मृत महिलेच्या मोबाईलवरून तिच्या ओळखीच्या लोकांना मेसेज पाठवत होता. मात्र १७ मे रोजी मुशी नदीजवळील अफझल नगर कम्युनिटी हॉलसमोरील कचराकुंडीत सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना छिन्नविछिन्न पडलेले मुंडके सापडले. यानंतर मलकपेठ पोलिसांनी या गुन्ह्याची नोंद करून तपासासाठी आठ पथके तयार केली.

सीसीटीव्ही फुटेजमुळे मिळाली माहिती

सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तपासानंतर पोलिसांना आरोपींची ओळख पटली त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

तर पोलिसांनी मृत महिलेचे बाकीचे शरीराचे तुकडे आरोपीच्या घरातून जप्त केले आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहे.

टॅग्स :policecrime