काँग्रेसपुढील पेच, राजीनामा नाट्यापलीकडचा

रविवार, 26 मे 2019

लोकसभा निवडणुकीतील पराभवाने काँग्रेसची विचित्र कोंडी केली आहे. घराणेशाहीच्या, दरबारी राजकारणाच्या शिक्‍क्‍यातून बाहेर कसे पडायचे हा पेच पक्षासमोर असल्याचे पक्षाच्या कार्यसमितीमधील घडमोडी आणि त्यानंतरच्या पक्षातील हालचालींतून दिसते.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील पराभवाने काँग्रेसची विचित्र कोंडी केली आहे. घराणेशाहीच्या, दरबारी राजकारणाच्या शिक्‍क्‍यातून बाहेर कसे पडायचे हा पेच पक्षासमोर असल्याचे पक्षाच्या कार्यसमितीमधील घडमोडी आणि त्यानंतरच्या पक्षातील हालचालींतून दिसते. जबाबादारी स्वीकारून राहुल गांधी यांनी राजीनामा दिला आणि अन्य कोणालाही नेतृत्व दिले तरी अप्रत्यक्षपणे गांधी घराण्याचे वर्चस्व संपत नाही आणि राजीनामा नाही दिला तरी गांधींच्या पलीकडे पाहताच येत नसल्याचा आक्षेप खोडता येत नाही. यातून राहुल यांनी राजीनाम्याची तयारी दाखवायची आणि इतरांनी त्यांना परावृत्त करायचे या अपेक्षित मळवाटेनेच पक्ष जातो आहे. यानंतरही राहुल राजीनाम्यावर ठाम राहिलेच, तर मात्र गांधी घराण्याबाहेरचा सर्वमान्य नेता शोधणे ही पक्षाची मोठीच कसोटी असेल. नेतृत्वाइतकाच पक्षासमोर संघटनेचा आणि पर्यायी राजकीय कार्यक्रमाचा खडखडाट आहे, याकडे मात्र दुर्लक्ष कायम आहे.    

लोकसभेच्या निकालांनी नरेंद्र मोदींच्या झंझावातात काँग्रेसची देशभर वाताहत झाली त्याचा अर्थ काँग्रेसचे सर्वोच्च अधिकारमंडळ असेलली कार्यसमिती कसा लावते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. काँग्रेसचा मानहानिकारक पराभव झाल्यानंतर त्याची जबाबदारी कोणावर टाकायची, म्हणजे खापर कोणावर फोडायचे या स्वभाविक प्रश्‍नाला उत्तर देताना पुन्हा एकदा गांधी घराण्याने त्यागमूर्ती व्हावे, पण बाकी पक्षाने म्हणजे पक्षाच्या नेतृत्वाभोवतीच्या प्रभावळीने तुमच्याशिवाय आहेच कोण? म्हणत गांधी घराण्याला अर्थाताच आताच्या स्थितीत राहुल गांधी यांना साकडे घालावे, पक्षात सगळे बदलायला हवे असे सांगत पुन्हा तेच ते या वर्तुळात फिरत राहावे हेच आवर्तन लोकसभा निवडणुकीनंतर होऊ घातले आहे. याचे सूतोवाच आज काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीतून समोर आले. फक्त या वेळी पक्षाने साकडे घातले तरी राहुल पद सोडण्यावर ठाम असल्याचे सागितले जाते ते पक्षासमोर नवा पेच तयार करणारे असेल.

बैठकीत राहुल गांधींनी राजीनामा द्यायची तयारी दाखवली. पक्षाने ती नाकारली आणि पक्षाच्या फेरबांधणीचे अधिकार राहुल यांनाच दिले. बदलायला हवे, पण कसे? या प्रश्‍नाचे उत्तर सापडत नसलेल्या पक्षाच्या चाचपडण्याची ही नांदीच होती. राहुल यांनी अध्यक्षपद सोडून पक्षात काम करण्याची तयारी बैठकीत दाखवल्याचे सांगितले जाते. त्यावर सोनिया गांधी, मनमोहनसिंग आणि प्रियंका गांधी - वद्रा यांनी राजिनामा देऊ नये, त्यामुळे भाजपलाच बळ  मिळेल, अशी भूमिका घेतली. यानंतर इतरांनी काही वेगळे मत मांडण्याची शक्‍यता उरतच नाही. तसेही या कार्यसमितीमधील कॅप्टन अमरिंदर सिंग वगळता बहुतेक नेते एकतर स्वतःच निवडणुकीत पराभूत झाले आहेत किंवा त्यांच्याकडे जबाबदारी असलेल्या राज्यात पक्षाची दाणादाण उडाली आहे. या स्थितीत पराभवाची जबाबदारी सामूहिक असल्याचे सांगत मागील पानवरून पुढे सुरू ठेवणे हेच सर्वांच्या सोयीचे. सहाजिकच राहुल यांचा राजीनामा देण्याचा मनसुबा एकमताने फेटाळला. कार्यसमितीने पराभव स्वीकारताना यापुढच्या आव्हानात्मक काळात राहुल याचे नेतृत्व आणि मार्गदर्शन गरजेचे असल्याचा ठरावच केला. यावर राहुल यांची भूमिका मात्र जाहीर झालेली नाही.

‘एनडीए’च्या खासदारांच्या बैठकीत एका बाजूला प्रचंड विजयाने आलेला तेवढाच मोठा आत्मविश्‍वास आणि दुसरीकडे काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत वेदनादायक पराभवामुळे खचलेले नेते, असे टोकाचे वातावरण आज दिल्लीत दोन आघाड्यांवर होते. काँग्रेसच्या पराभवाचा धक्का नेत्यांच्या देहबोलीतूनही जाणवणारा होता. त्याचे सावट प्रत्यक्ष बैठकीवर स्वाभाविकपणे होते. यातच कालपासून राहुल हे पक्षाध्यक्षपद सोडाण्याची घोषणा करतील अशी अटकळ बांधली जात होती. राहुल यांनी वायनाडमधून मोठा विजय मिळवला असला, तरी अमेठीच्या घरच्या मैदानावर त्यांचा पराभव झाल्याचा धक्काही यामागे होता. काँग्रेसने काय केले पाहिजे याचे असंख्य सल्ले पराभवापासून अनेक घटकांतून दिले जात आहेतच. या साऱ्याचा परिणाम म्हणून त्यांनी राजीनाम्याची तयारी दाखवणे आणि अन्य नेत्यांनी ती फेटाळणे यात अनपेक्षित असे काहीच नव्हते. लोकसभा निवडणुकीने काँग्रेससमोर आणलेल्या कोंडीचे हे एक लक्षण आहे. राहुल यांनी पद सोडले तरी ते अन्य कोणाकडे द्यायचे हा पेच पक्षासमोर आहे. पर्याय म्हणून माध्यमातून चर्चेत असलेले पक्षातील ज्येष्ठ असोत की राहुल यांचे सहकारी असोत, यातील बहुतेकांना निवडणुकीत स्वतःचा पराभवही टाळता आलेला नाही. यातूनही अन्य कोणीही पक्षाचे नेतृत्व केले तरी पक्षावरील गांधी घराण्याचे वर्चस्व अत्यंत स्पष्ट आहे. सोनिया, राहुल, प्रियंका पक्षात सक्रिय असताना अन्य कोणीही स्वतंत्रपणे निर्णय घेईल ही शक्‍यता काँग्रेसच्या सध्याच्या रचनेत कमी आहे. 

त्यामुळे राहुल यांनी पद सोडूनही पक्षावरील घराणेशाहीचा आरोप जात नाही. राजिनाम्याविषयी राहुल काहीच बोलले नाहीत तर गांधी घराण्याचे असल्यानेच त्यांना उत्तरदायी ठरवले जात नाही, हा आक्षेप कायम राहतो. या कोंडीतून वाट काढण्याचा मार्ग म्हणूनच राजीनामा देण्याची तयारी आणि तो पक्षाने फेटाळणे हे घडल्याचे मानले जाते. खरेतर काँग्रेसमधील पेच राहुल यांच्या अध्यक्षपदी असण्या- नसण्यापेक्षाही अधिक गंभीर स्वरूपाचा आहे. बैठकीनंतर एकही नेता काहीही बोलत नव्हता याचे कारणही पक्षापुढील या संकटातच आहे.

काँग्रेस निवडणुकीत पराभूत होण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही, मात्र या वेळी पक्षाची अवस्था गलितगात्र झाली आहे. पक्षाला उभारी देणे आणि विधानसभा निवडणुकांसाठी तयार करणे यात नेतृत्व हा एक मुद्दा आहे. त्यापलीकडे पक्षाचे संघटन देशभरात खिळखिळे झाले आहे. लोकांना आकर्षित करणारा राजकीय कार्यक्रम पक्षाला देता येत नाही. या आव्हानांचीही पक्षाला दखल घ्यावी लागेल. या आघाडीवर तातडीने काही घडताना दिसत नाही. तूर्त पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनाम्याची लाट पक्षात येईल अशीच चिन्हे आहेत. उत्तर प्रदेशातून राज बब्बर, ओडिशातून निरंजन पटनायक, महाराष्ट्रातून अशोक चव्हाण अशी राजीनामा देऊ इच्छिणाऱ्यांची रांग तयार झाली आहे. पक्षाच्या निर्णयानंतरही राहुल राजिनाम्यावर ठाम राहतात काय, यावर पक्षाची पुढची वाटचाल अवलंबून असले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shriram Pawar analysis Congress President Rahul Gandhi resignation issue