आवाजों के बाजारों में...

Thursday, 13 August 2020

उर्दूचे लोकप्रिय कवी-गझलकार राहत इंदौरी यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या काही ओळींवरून  समाजमाध्यमातल्या काही ठरावीक मंडळींनी - त्यांना त्यांच्या निधनानंतरही - लक्ष्य केलं. राहत यांच्या काही विशिष्ट शेरो-शायरीबाबत मतभेद असू शकतात, त्यासाठी त्यांच्यावर टीका करणं, त्यांना शब्दांनी झोडपून काढण्यातही काही गैर नाही. तोही अभिव्यक्तीचा भाग अवश्‍य मानावा. मात्र, असल्या कारणांसाठी त्यांना शत्रू ठरवून बेदखल करणं कितपत योग्य?

लोग हर मोड पे रुक रुक के सँभलते है क्‍यूँ?
इतना डर जाते है तो फिर घर से निकलते है क्‍यूँ?

असं खणखणीतपणे विचारताना जणू वास्तवावर बोट ठेवणाऱ्या राहत इंदौरी यांचं निधन झालं. एक प्रसिद्ध शायर, गीतकार गेला. त्यापलीकडं सृजनशीलतेची, जिला ग़ालिबनं 'फाकामस्ती' असं म्हटलं आहे, ती काय असते याचं प्रत्यंतर देणारा प्रतिभावंत हिंदुस्थानी गेला. होय, हे स्पष्टपणे सांगायला हवं. राहत यांनी अनेकांची टोपी उडवली, त्यांच्या शायरीचा झुकाव उघड होता...मात्र, कोणत्याही उदारमतवादी लोकशाहीत बंडखोर अभिव्यक्तीला जो अवकाश असतो, असला पाहिजे त्या परिघातच शब्दांची बरसातच नव्हे तर टोचरे, बोचरे बाणही सोडणारा हा प्रतिभावंत सच्चा हिंदुस्थानी होता.

Image

किसी के बाप का ये हिंदोस्तान थोडी है?
हा त्यांचा जहाल प्रहार वर्मी लागलेले लोक, राहत गेल्यानंतर, टवाळी करताना समाजमाध्यमांवर आनंद लुटत होते. 'ये व्हेंटिलेटर किसी के बाप का थोडी है' असं हिणवत होते. हाच शायर 'लहू से मेरी पेशानी पे हिंदुस्तान लिख देना' असंही सांगत होता, हे मात्र अशा वेळी विस्मरणात टाकलं जातं होतं. हे टिपिकल बहुसंख्याकवादी राजकारण आहे.

राहत यांच्या निधनानंतर त्यांचं व्यक्तिमत्त्व, त्यांची शायरी, त्यांची सृजनशीलता, इतकंच नव्हे तर, त्यांचा धर्म या सगळ्या बाबी ध्रुवीकरणासाठीची हत्यारं बनावीत यापरतं दुर्दैव ते कोणतं? सर्वसमावेशकतेचं बोलणाऱ्या कुणालाही देशद्रोही ठरवणाऱ्या टोळ्या मोकाट सुटल्याचा जमाना आता रूढ होतो आहे याचं हे प्रत्यंतर. ते धक्कादायक आहे. 'तमिळांना स्वयंनिर्णयाचा अधिकार आहे,' असं संसदेत अण्णा दुराई म्हणाले होते तेव्हा सर्वपक्षीय सदस्यांनी ते अमान्य केलं होतं, त्यावर टीकाही केली होती. मात्र, तेव्हा लगेच कुणी देशद्रोहाचं लेबल त्यांना लावलं नव्हतं. अशा देशात आता न आवडणारे प्रश्‍न विचारणारे नकोसे होतात हेही समजू शकतं; पण त्यासाठी राष्ट्रवादाचा आधार घेतला जातो हे विचार करायला लावणारं. कुठून कुठं आलो आपण? मतभेदांना, वेगळ्या दृष्टिकोनाला शत्रुत्व ठरवणं, त्यावरून देशनिष्ठा जोखणं हे या देशाच्या वाटचालीशी विसंगत. म्हणूनच  राहत यांच्या निधनानंतर बाहेर आलेली मळमळ दखलपात्र.

Image

राहत इंदौरी यांची प्रतिभा, त्यांची आशिकमिज़ाजी, मुशायरा डोक्‍यावर घेणारा त्यांचा खास अंदाज यावर नव्यानं काही सांगावं असं नाही. त्यांच्या त्या आवेशी सादरीकरणावरही भरपूर टीका झालीच होती. या आवेशी-आवेगी शायरीपलीकडं राहत यांनी सादगीपूर्ण, तरल शायरीही भरपूर दिली. मौनात, एकांतात आपलाच शोध घेणारं हे कसदार देणं; पण निदा फाजली म्हणतात ना 'आवाजों की बाजारों मे खामोशी सुनता है कौन?' तसं आहे हे.

राहत हे मुशायऱ्यात आले की ते माहौल उभा करणार हे ठरलेलचं असे. मुशायरा दिल्लीतला असो, अलाहाबादमधला असो, कराचीतला असो की दुबईतला. आरोळ्या-टाळ्यांनी सभागृह डोक्‍यावर घेतलं गेलं नाही असं कधी झालं नाही.

त्यांच्याबद्दलचा किस्सा सांगितला जातो : 'शाळकरी वयात जाँनिसार अख़्तर यांच्यासारख्या उत्तुंग शायराला 'मलाही तुमच्या मुशायऱ्यात शायरी सादर करायची आहे,' असं राहत यांनी सांगितलं. जाँनिसार यांनी 'आधी पाच हजार शेर पाठ कर; मग लिहायला सुरुवात कर,' उत्तर दिलं, तेव्हा राहत यांचं प्रत्युत्तर होतं, 'ते तर आत्ताच पाठ आहेत'. जाँनिसार यांनी तेव्हा राहत यांना सही देताना मिसरा (शेराची एक ओळ) लिहिला. ती ओळ संपताच शेराची पुढची ओळ रचून राहत मोकळे झाले.'

उत्स्फूर्तता हे राहत यांचं वैशिष्ट्य. ते त्यांनी आयुष्यभर जपलं. गझलेचा शेर इष्क, प्यार-व्यार असं काही सांगू पाहतो, असं वाटत असतानाच,  मेंदूला झिणझण्या आणणारं असं काही ते धाडकन पुढ्यात टाकायचे. ही ताकद फार क्वचित कुणाकडं असते.

मुद्दा आहे कवी-शायर-विचारवंत यांच्या रचना, भूमिकावंरून देशद्रोहाचे शिक्के मारायचा अधिकार समाजमाध्यमी ट्रोलभैरवांना कुणी दिला? किंवा त्याआडून याचं राजकाण करू  पाहणारे लोक, समाज म्हणून आपल्याला कुठं नेत आहेत?

राहत यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर तिरकस शैलीत टीकात्मक शेरोशोयरी केली होती. त्या शेरोशायरीचं समर्थन करायचं कारण नाही. गुजरातच्या दंगलीच्या वेळी काहीएक भूमिका घेणारी शायरीही राहत यांनी केली. याचा राग येऊ शकतो, त्यावर मतभेदही असू शकतात. त्यासाठी त्यांच्यावर टीका करणं, त्यांना शब्दांनी झोडपून काढण्यातही काही गैर नाही. तोही अभिव्यक्तीचा भाग अवश्‍य मानावा. मुद्दा असल्या कारणांसाठी शत्रू ठरवून बेदखल करण्याचा आहे. राहत हे खणखणीत प्रतिभेचे धनी होते. त्यांचं उर्दूवर जसं उत्तम प्रभुत्व होतं तसंच ते हिंदीवरही होतं. ते प्रश्‍न विचारायचे, विसंगतींना टोकायचे, अंगावर यायची हूल देणाऱ्यांना शिंगावर घ्यायचे. यातून घायाळ झालेल्यांचा राग समजू शकणारा आहे; पण 'राहत हे देशाचे शत्रू होते,' असं सागणं हा सत्याशी अपलाप आहे. "माय वे ऑर हाय वे' असं वैचारिक क्षेत्रातही वातावरण तयार करू पाहणाऱ्यांना हे समजणं कठीण; पण आपापली मतं मांडणं हीच तर या देशाची पंरपरा आहे.

Image

एकाच वेळी निरनिराळी मतं, विचार मांडणारे, एकमेकांना विरोध करणारे, छेद देणारे विचार तेवढ्याच ताकदीनं मांडणारे, खंडन-मंडनाची पंरपरा तेवत ठेवणारे पिढ्यान् पिढ्या इथं नांदत आले. या सर्वांना पोटात घेऊन अखंड वाहते ती गंगा-जमनी तहजीब. ज्यांना तीच अडचणीची वाटते, ज्यांची हिंदुस्थानची कल्पना एकसाची, एकारलेली, सांस्कृतिक वर्चस्ववादी आहे, त्यांना राहत किंवा त्यांच्यासारखे प्रतिभावंत समजणं, पचणं कठीण. त्याचबरोबर अशा मुखंडांचा प्रतिवाद करताना राहत यांच्या प्रत्येक कृतीचं, प्रत्येक आविष्काराचं समर्थनच केलं पाहिजे असंही नाही. त्यांची सगळी मतं पटलीच पाहिजेत हा आग्रह वेडेपणाचा. तसं कोणत्याच विचारवंत-प्रतिभावंताचं सारं काही जसंच्या तसं पटणं कठीण. मुद्दा ते व्यापक अर्थानं समाजाला पुढं नेणारं, सौहार्द टिकवणारं आहे की नाही इतकाच असायला हवा. त्याकडं दुर्लक्ष करून, काही ओळी निवडून वाद माजवणं हे 'पोस्ट ट्रुथ'च्या जमान्याला साजेसंच, अर्थातच म्हणूनच वास्तवाशी इमान राखणारंही नाही.

असं का व्हावं? एका कवीची, त्याच्या काही ओळींची इतकी दहशत का वाटावी? जे राहत यांच्याबाबतीत घडतं आहे तेच काही काळापूर्वी फैज़ अहमद फैज़ यांच्याविषयीही झालं. फैज़ तर निर्विवाद तरक्कीपसंद शायरीचे अध्वर्यू. पाकिस्तानात राहून पुरोगामी विचार कायम ठेवणारे, तो आपल्या लेखणीतून दमदारपणे मांडणारे फैज़ हे त्यांच्या मृत्यूनंतर कित्येक वर्षांनी भारतात लक्ष्य बनतात तेव्हा ते 'भारतविरोधी शक्तींना बळ देणारे' म्हणून टीकेचे धनी ठरतात; किंबहुना हिंदुत्ववाद्यांना ते हिंदूविरोधी वाटतात. गमतीचा भाग म्हणजे, पाकिस्तानातल्या सनातन्यांना तेच फैज़ इस्लामविरोधी वाटायचे! पाकच्या हुकूमतींना ते देशविरोधी वाटायचे. याचं कारण काय? फैज़ काय किंवा राहत काय, या शायरांची जातकुळी वेदनेला आवाज देणारी, सत्तेच्या मखरात बसणाऱ्यांना टोचणारी, म्हणून त्या त्या वेळच्या विरोधात उभं राहणाऱ्या प्रवाहांना आपापले लढे पुढं नेताना आपलीशी वाटणारी.

राहत यांच्या

सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में
किसी के बाप का हिंदोस्तान थोडी है?

या ओळी देशातल्या सत्तेच्या विरोधात लढणाऱ्या तरुणांना भावल्या. त्यांनी त्या लढ्याचं गीत म्हणून त्या वापरल्या, तसंच फैज़ यांची

हम देखेंगे
लाजिम है कि हम देखेंगे
जो लौहेअजल पे लिख्खा है, हम देखेंगे

ही अजरामर रचना अनेक आंदोलनांत वापरली गेली. लढाईचं हत्यार बनली. आपल्याकडं नेमकं हेच घडलं. नेमकं तेच काहींना खुपतं. आंदोलन 'जेएनयू'तलं असो की 'एएमयू'तलं असो, तिथं या दोघांच्या काव्यपंक्ती आंदोलनात जान आणणारी घोषवाक्‍यं बनल्या. त्यामुळे राहत आणि फैज़ हे बहुसंख्याकवाद्यांच्या रडारवर आले.

खरं तर दोघांनीही काही या आंदोलनांसाठी लिहिलेलं नव्हतं. राहत यांनी ती गझल कधी लिहिली हे त्यांना आठवताही येत नव्हतं. 30-35 वर्षांपूर्वी कधीतरी ती लिहिली गेली. मधला बराच काळ ती मुशायऱ्यांत वगैरे कधी म्हटलीही नाही असं त्यांनी सांगितलं होतं. 'जेएनयू'मधलं आंदोलन, 'एएमयू'मधला वाद, 'सीएए'वरच्या आंदोलनात त्या ओळींचा उच्चार पुनःपुन्हा होऊ लागला. काहींना वाटलं ही आंदोलनं आपल्याला आव्हान देत आहेत, जे रूढ करू पाहतो आहोत त्यात अडथळे बनत आहेत. आंदोलक-तरुणांना प्रेरणा देणारी गीतं आणि त्यांचे कर्ते मग दुश्मन वाटायला लागले तर नवल नाही.

Image

आता जे मान्य नाही त्याचा प्रतिवादही करता येऊ शकतो. भूमिका आंदोलनाच्या असोत की त्या गीतांमागच्या असोत, असा प्रतिवाद करण्यात काहीच गैर नाही. मुद्दा आहे तो त्यात देशविरोधी, हिंदूविरोधी अर्थ शोधण्याचा.

फैज़ यांच्या बाबतीत हेच घडलं. फैज़ यांनी "हम देखेंगे' ही रचना लिहिली त्याला अर्धशतक उलटून गेलं आहे. तेव्हा ती रचना जनरल झिया यांच्या दडपशाही-राजवटीच्या विरोधात अंगार बूनन पुढं आली. खरं तर त्या रचनेतल्या भावना सर्वसामान्य माणसाच्या मनातल्या प्रक्षुब्ध भावना होत्या. त्यांना इक़्बाल बानो यांनी आवाज दिला. जेव्हा त्यांनी

अहले हक़म के सर ऊपर
जब बिजली कड कड कडकेगी

या ओळी गायल्या आणि त्या ओळींना जमलेल्या लोकांनी जो प्रतिसाद दिला तो सत्तेवर बसलेल्यांच्या पायाखालची जमीन हादरवणारा होता. फैज़ तिथं रोषाचे धनी ठरले. आपल्याच देशात उपहासाचे, टीकेचे धनी झाले. याचं कारण 'हम देखेंगे' हे दडपशाही करणाऱ्या सत्तेला आव्हान देणाऱ्यांचं प्रेरणागीत बनलं होतं.

हे वाचा - दिल की 'राहत'! 'दो गज जमीं' के 'जमीनदार'

आपल्याकडं तेच गीत आंदोलन करणाऱ्या मुलांच्या ओठावर आलं तेव्हा भीती कुणाला वाटू शकते? त्यावर सोपा उपाय म्हणजे हे गीत देशविरोधी शक्तीचं प्रतीक बनवणं, देशातल्या बहुसंख्य समाजाच्या विरोधातलं ठरवणं, ज्यातून सहजपणे ध्रुवीकरण करता येतं! एकदा त्या भावनांना हात घातला की तर्क वगैरे फिजूल ठरतात. "या बाजूचे की त्या बाजूचे'; किंबहुना 'या धर्माचे की त्या धर्माचे' इतकं बायनरीतून बघितलं जाऊ लागतं. तसचं बघावं याची सक्ती करता येते. 'हम देखेंगे' हा बेमुर्वतपणे सत्ता राबवणाऱ्यांना इशारा आहे.

तो

सब तख़्त उछाले जाएंगे
सब ताज गिराए जाएंगे

असं बजावतो. सर्वसामान्य माणसाला मसनद म्हणजे तख्तावर बसवण्याविषयी बोलतो. इतकंच नव्हे तर, "वो मंजर भी है और नाज़िर भी' असं सांगतो, म्हणजे, तोच दृश्यही आहे आणि तोच बघणाराही आहे.
दिसतं काही तत्त्वज्ञानात साधर्म्य!

तरीही कम्युनिस्ट असलेल्या आणि इस्लामविरोधी म्हणून गणल्या गेलेल्या फैज़ यांच्यावर हिंदूविरोधी शिक्का मारणाऱ्यांनी मारत राहावं.
तसंच मग

जो आज साहिबे मसनद है, कल नही होंगे
किराएदार है, जाती मकान थोडी है?

असं सागणाऱ्या राहत यांच्या शायरीवरून वाद घालत राहावं.

"बोल, के लब आजा़द है तेरे' लिहिणारे फैज़ काय, राहत इंदौरी काय किंवा "हम को मालूम है जन्नत की हक़ीक़त लेकिन, दिल को बहलाने को ग़ालिब ये खयाल अच्छा है' असं किंवा "कहाँ मयखाने का दरवाजा ग़ालिब और कहाँ वाईज, बस इतना जानते है कि वो जाता था कि हम निकले' असं पाखंड मांडणारा ग़ालिब काय किंवा 'कौन कहता है आसमान में सुराग नही होता?' असा आवाज देणारे दुष्यंतकुमार काय... असं बंडखोर काव्यसृजन होतच राहतं. कुठल्याही काळात सर्वांनाच नाही धाकात ठेवता येत; मग त्यांना बेदखल करायचे प्रयत्नही तसेच समांतर चालत राहतात.
Image

असला गदारोळ करणाऱ्या सर्वांनाच ते काव्य, त्याच्या रचनाकर्त्याच्या भावना, भूमिका समजत नाहीत असं मुळीच नाही. त्यांचा मुद्दा हा असतो की त्याचा वापर जर आजच्या राजकारणात करता येत असेल तर तसा वापर करून तो मुद्दा पेटता का ठेवू नये! अशा आणि इतक्‍या राजकारणग्रस्ततेत काव्याचा, बंडखोरीचा गळा घोटण्याचे प्रयत्न स्वाभाविकच. शेवटी, हत्यारांपेक्षा शब्दशस्त्रं अधिक परिणामकारक असतात. ज्यांना भावना पेटवायच्या आहेत, राजकारणाच्या पोळ्याच भाजायच्या आहेत त्यांना ते करत राहू द्यावं.

शेवटी, संस्कृत कवीनं लिहून ठेवलं आहे :

इतर कर्मफलानि यदृच्छया
विलिख तानि हे चतुरानन
अरसिकेषु कवित्वनिवेदनं
शिरसि मा लिख मा लिख मा लिख

( अर्थ : हे चतुरानना, माझ्या नशिबात काहीही लिही; पण अरसिकाला काव्य सांगण्याचं माझ्या कपाळी लिहू नकोस!)

अधिक काय लिहिणे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shriram pawar write on reactions after rahat indori death