
Karnataka Election : कर्नाटकात योजनांना मान्यता; सिद्धरामय्यांच्या शपथविधीला विरोधी ऐक्याचे दर्शन
बंगळूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजय नोंदविल्यानंतर आज ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपदाची तर प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी अन्य आठ मंत्र्यांचाही शपथविधी पार पडला. या शपथविधीच्या निमित्ताने कन्नडभूमीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळाली.
या सोहळ्यानंतर टीम सिद्धरामय्या कामाला लागली असून पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत पाच हमी योजनांना तत्त्वत: मान्यता दिल्याचे जाहीर करण्यात आले. येथील खचाखच भरलेल्या कंठीरव स्टेडियमवर कार्यकर्त्यांच्या जल्लोषात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
दहा वर्षांनंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या सिद्धरामय्या यांनी यापूर्वी याच मंचावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. सिद्धरामय्या यांनी देवाच्या नावाने, तर शिवकुमार यांनी नॉनविनकेरेच्या गंगाधर अज्जय्या यांच्या नावाने शपथ घेतली. त्यांच्यानंतर डॉ. जी. परमेश्वर, के. एच. मुनियप्पा, के. जे. जॉर्ज, एम. बी. पाटील, सतीश जारकीहोळी, प्रियांक खर्गे, रामलिंगारेड्डी आणि जमीर अहमद खान यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका
शपथविधीनंतर लगेच पहिली मंत्रिमंडळ बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत सिद्धरामय्या म्हणाले की, ‘‘ पाचही आश्वासनांना बैठकीत तत्त्वत: मान्यता दिली आहे. ‘गृहज्योती’ योजनेत प्रत्येक घराला २०० युनिट मोफत वीज, ‘गृहलक्ष्मी’ योजनेत गृहिणींना दरमहा दोन हजार रुपये, ‘अन्नभाग्य’ योजनेत प्रतिव्यक्ती १० किलो तांदूळ, ‘शक्ती’ योजनेंतर्गत महिलांना मोफत बस प्रवास, बेरोजगार पदवीधरांना दरमहा तीन हजार रुपये, बेरोजगार पदविका पदवीधारकांना दरमहा १५०० रुपये देण्यात येणार आहेत.

या पाचही योजनांसाठी दरवर्षी ५० हजार कोटी अतिरिक्त खर्च येऊ शकतो. आम्ही काटेकोर करसंकलनाद्वारे आर्थिक भार कमी करू शकतो. केंद्राकडून यंदा ५० हजार कोटी रुपये येणे बाकी आहे. कर्नाटकातून आम्ही सुमारे चार लाख कोटी रुपये कर भरत असतो. आपल्या राज्याचा अर्थसंकल्प ३.१० लाख कोटी रुपये आहे. इतर राज्यांशी तुलना केली तर आमच्यावर अन्याय झाला आहे.’’