Karnataka : सिद्धरामय्या दुसऱ्यांदा बनले कर्नाटकचे मुख्यमंत्री; डीकेंनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Siddaramaiah took oath as CM of Karnataka

Karnataka : सिद्धरामय्या दुसऱ्यांदा बनले कर्नाटकचे मुख्यमंत्री; डीकेंनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

Karnataka Swearing-in Ceremony Updates : सिद्धरामय्या यांनी आज कर्नाटकात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून, तर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. याशिवाय, अनेक आमदारांनाही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

हा शपथविधी सोहळा बेंगळुरूच्या कांतीराव स्टेडियमवर सुरू आहे. 13 मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. काँग्रेसनं 135, भाजपनं 66 आणि जेडीएसनं 19 जागा जिंकल्या आहेत.

काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावरून सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यातील कोंडी अनेक दिवस सुरूच होती. मात्र, अनेक दिवसांच्या भेटीनंतर आणि हायकमांडनं मन वळवल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये एकमत होऊ शकलं. यावेळी जी परमेश्वर, एम. बी. पाटील, सतीश जारकीहोळी, प्रियंक खर्गे यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.

या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना नेते अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, अभिनेते कमल हसन, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आदी उपस्थित होते. काँग्रेसने या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक नेत्यांना निमंत्रण दिलं. मात्र, बसपा नेत्या मायावती, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तेलंगनाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं.

यावेळी राहुल गांधी म्हणाले, या विजयाचं एक कारण म्हणजे काँग्रेस गरीब, दलित, आदिवासी आणि मागासलेल्या लोकांच्या पाठीशी उभी राहिली. सत्य आमच्या सोबत होतं. तुम्ही सर्वांनी भाजपच्या द्वेषाचा पराभव केला आहे. तुम्ही भाजपच्या भ्रष्टाचाराचा पराभव केला आहे. भाजपकडं अमाप संपत्ती आणि पैसा होता आणि आमच्याकडं काहीच नव्हतं. त्यामुळं आम्ही कर्नाटकातील जनतेचे मनापासून आभार मानतो.