चिलिका सरोवर परिसराला बर्ड फ्लूचा वेढा 

स्मृती सागरिका कानुनगो
शनिवार, 22 डिसेंबर 2018

भुवनेश्‍वर : ओडिशातील चिलिका सरोवर परिसरात बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. येथे काही दिवसांपूर्वी कावळे मृतावस्थेत आढळल्याने बर्ड फ्लूचा संशय बळावला आहे. याच्या तपासासाठी केंद्रपाडा जिल्हा प्रशासनाने स्थलांतरित पक्षी आणि भीतरकनिका राष्ट्रीय उद्यान व परिसरात असलेल्या कुक्कुटपालन केंद्रातील पक्ष्यांच्या विष्ठेचे व रक्ताचे नमुने गोळा करण्यास सुरवात केली आहे. 

चिलिका सरोवराचा परिसर बर्ड फ्लूग्रस्त असल्याचे राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून परिसरातील सनसाही, मालुदा, अलंदा आदी गावांमधील कोंबड्या मारण्यास सुरवात झाली आहे. कुक्कुटपालन केंद्रातील पक्षी व कावळ्यांच्या नमुन्यात "एच5एन1' विषाणू आढळल्यानंतर पक्ष्यांना मारण्याचा आदेश राज्य सरकारने दिला असून, 18 डिसेंबरपर्यंत एक हजार पाळीव पक्षी मारण्यात आल्याचे ओडिशाच्या मत्स्य उद्योग व पशुधन विकास विभागाचे सचिव विशाल गगन यांनी सांगितले. 

कुक्कुटपालन केंद्रातील पक्ष्यांच्या रक्ताचे 180 नमुने व स्थलांतरित पक्ष्यांच्या विष्ठेचे 80 नमुने पशुवैद्यकीय डॉक्‍टरांच्या पथकाने गोळा केले असल्याची माहिती राजनगरचे अतिरिक्त पशुवैद्यकीय अधिकारी देवीप्रसाद कुंद यांनी दिली. हे नमुने कटकमधील पशुरोग संशोधन संस्थेत (एडीआरआय) पाठविले जाणार असून, तेथून ते भोपाळमधील उच्च सुरक्षा पशुरोग प्रयोगशाळेत जातील. 

बर्ड फ्लूसाठी उपाययोजना 

- जनजागृतीसाठी माहितीपत्रकांचे वाटप 
- उपचारासाठी फिरते पशुवैद्यक वाहन 
- 35 हजार पक्ष्यांचे लसीकरण 
- तत्काळ प्रतिसाद पथकाची स्थापना 

Web Title: Siege of Bird Flu on Chilika Sarovar area