भारत-बेलारुसमध्ये 10 करारांवर स्वाक्षऱ्या

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

"मेक इन इंडिया'अंतर्गत संरक्षण क्षेत्राचा संयुक्त विकास व उत्पादनवाढीला प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

संरक्षण, व्यापार, गुंतवणूक क्षेत्रांत सहकार्य वाढवणार

नवी दिल्ली: भारत व बेलारुसने आज विविध क्षेत्रांत परस्पर सहकार्य वाढविण्यासंदर्भात दहा करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. संरक्षण क्षेत्राचा संयुक्त विकास करण्याबाबतच्या एका सामंजस्य करारावरही उभय देशांमध्ये एकमत झाले.

बेलारुसचे अध्यक्ष ए. जी. लुकाशेंको दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून, आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. दोन देशांमध्ये आर्थिक भागीदारी वाढविण्यावर भर देणे, हा या चर्चेतील महत्त्वाचा मुद्दा होता. या वेळी उभय देशांत संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, तेल व गॅस, शिक्षण तसेच क्रीडा क्षेत्रात सहकार्य वाढविण्याविषयी 10 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

लुकाशेंको यांचे स्वागत करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ""भारत व बेलारुसमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झालेल्या घटनेला 25 वर्षे पूर्ण झाली असून, लुकाशेंको यांच्याशी झालेल्या चर्चेत आम्ही उभय देशांतील द्विपक्षी संबंधाच्या संरचनेचा आढावा घेतला. दोन्ही देश हे संबंध आणखी वृद्धिंगत करण्यासाठी कटिबद्ध आहेत.''

दरम्यान, लुकाशेंको यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, तसेच उपराष्ट्रपती व्येंकय्या नायडू यांचीही भेट घेत चर्चा केली. या वेळी त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळातील सदस्यांसाठी एका बिझनेस फोरमचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Signing 10 agreements in India-Belarus