शीख दंगल; तब्बल तीन दशके चालले खटल्याचे कामकाज 

वृत्तसंस्था
सोमवार, 17 डिसेंबर 2018

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. मुरलीधर आणि न्या. विनोद गोयल यांच्या खंडपीठाने सज्जन कुमार यांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे, हत्येला मदत करणे, धर्माच्या नावावर दोन गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे, गुरुद्वाराचे नुकसान करून सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विविध कलमांखाली खंडपीठाने आज सज्जन कुमार यांना दोषी ठरविले.

नवी दिल्ली- दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. मुरलीधर आणि न्या. विनोद गोयल यांच्या खंडपीठाने सज्जन कुमार यांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे, हत्येला मदत करणे, धर्माच्या नावावर दोन गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे, गुरुद्वाराचे नुकसान करून सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विविध कलमांखाली खंडपीठाने आज सज्जन कुमार यांना दोषी ठरविले.

जगदीश कौर, जगशेर कौर आणि निरप्रीत कौर या तीन प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या साक्षींच्या आधारे सज्जन कुमार यांना दोषी ठरविण्यात आले असल्याचे न्यायालयाने नमूद केले. जगदीश कौर यांचे पती, मुलगा आणि तीन चुलतभाऊ यांची हत्या करण्यात आली होती. गुरुद्वाराला आग लावण्याच्या घटनेचा साक्षीदार असलेल्या निरप्रीत यांच्या वडिलांना जमावाने जिवंत जाळले होते. या सर्व घटनांचा खंडपीठाने निकालपत्रात उल्लेख केला आहे.

या प्रकरणात इतर पाच आरोपींना शिक्षा ठोठविण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निकालही खंडपीठाने कायम ठेवला आहे. कनिष्ठ न्यायालयाने 2013मध्ये कॉंग्रेसचे माजी नगरसेवक बलवान खोखर, हवाई दलाचे निवृत्त अधिकारी कॅप्टन भागमल आणि गिरीधारी लाल यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती, तर माजी आमदार महेंद्र यादव आणि किशन खोखर यांना तीन वर्षांच्या कारावासासाठी शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाच्या आजच्या निकालात खोखर, भागमल आणि लाल यांची जन्मठेप कायम ठेवण्यात आली असून, यादव आणि किशन खोखर यांना दहा वर्षांच्या तुरुंगावासाठी शिक्षा ठोठावली आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची 31 ऑक्‍टोबर 1984 मध्ये हत्या झाल्यानंतर दिल्लीसह देशभर शीखविरोधी दंगली उसळली होत्या.

सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार 
न्यायालयाने 29 ऑक्‍टोबर रोजी या खटल्याची सुनावणी पूर्ण केली होती. सुनावणीनंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. खंडपीठाने आज निकालाचे वाचन केले. या प्रकरणी सीबीआय, दंगलपीडित आणि दोषींनी या प्रकरणी याचिका दाखल केल्या होत्या. खंडपीठाच्या आजच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती सज्जन कुमार यांच्या वकिलाने दिली. 

1984मध्ये झालेल्या शिखविरोधी दंगलप्रकरणी न्यायाला उशीर झाला असला तरी अखेर न्याय मिळाला आहे. - उमर अब्दुल्ला, जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री
 

Web Title: Sikh riots, case more than three decades in Court