"शॉटगन'चा निशाणा पुन्हा एकदा भाजपवर टीका 

पीटीआय
शुक्रवार, 18 मे 2018

विविध मुद्यांवरून आपल्याच पक्षावर टीकेची एकही संधी न सोडणारे भाजपचे बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना कर्नाटकमधील घडामोडींमुळे पुन्हा एकदा निशाणा साधण्याची संधी मिळाली आहे. जनशक्तीपेक्षा धनशक्तीला वरचढ ठरविणारे राजकारण अमान्य असल्याची टीका त्यांनी भाजपवर केली आहे. 

पाटणा -  विविध मुद्यांवरून आपल्याच पक्षावर टीकेची एकही संधी न सोडणारे भाजपचे बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना कर्नाटकमधील घडामोडींमुळे पुन्हा एकदा निशाणा साधण्याची संधी मिळाली आहे. जनशक्तीपेक्षा धनशक्तीला वरचढ ठरविणारे राजकारण अमान्य असल्याची टीका त्यांनी भाजपवर केली आहे. 

कर्नाटकात स्पष्ट बहुमत नसतानाही सरकार स्थापन करण्याच्या भाजपच्या निर्णयावर शत्रुघ्न सिन्हा यांनी आज आश्‍चर्य व्यक्त केले. कॉंग्रेस आणि जेडीएस या दोघांना मिळून बहुमत असताना त्यांनाच सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण देणे योग्य होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. वरिष्ठ नेत्यांना प्रश्‍न विचारताना सिन्हा यांनी, "तुम्ही आगीशी का खेळत आहात? लोकशाहीचे रक्षकच तिची चेष्टा करत आहेत. जे लोकशाहीवर अद्यापही प्रवचने देत आहेत, तेच असे व्यवहार करत आहेत. हे जोड-तोडीचे राजकारण आम्हाला अमान्य आहे. तुम्ही सर्व लोकांना सर्व काळ फसवू शकत नाही, अशी म्हण आहे. ही म्हण तुम्हाला लागू आहे,' असे ट्‌विट केले आहे. 

स्टॅलिन यांचीही टीका 
कर्नाटकात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याबद्दल त्यांचे कौतुक करणारे द्रमुक नेते एम. के. स्टॅलिन यांनी आज येडियुरप्पा यांच्या शपथविधीनंतर मात्र भाजपवर तोंडसुख घेतले. बहुमत नसताना सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांचा वापर करून घेणे हा लोकशाहीचा खून असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अघटनात्मक पद्धतीने वागत आहेत, अशी टीका स्टॅलिन यांनी केली आहे. तमिळनाडूतही मोदींनी राज्यपालांचा असाच वापर करून घेतला होता, आता कर्नाटकातही ते तेच करत आहेत, असे स्टॅलिन म्हणाले. 

Web Title: Sinha criticise on bjp again