
Manish Tiwari : प्रत्यक्ष ताबा रेषेवरील स्थितीबाबत श्वेतपत्रिका आणा - मनीष तिवारी
बंगळूर : भारताची चीनलगत असलेल्या प्रत्यक्ष ताबा रेषेबाबत केंद्र सरकारने लवकरच श्वेतपत्रिका आणावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी केली आहे. मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तिवारी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केंद्र सरकारचे ‘उपहासात्मक’ कौतुक केले.
तिवारी म्हणाले, की कोणत्याही सरकारला पाच निकषावर सिद्ध व्हावे लागते. देशाची बाह्य सुरक्षा, अर्थव्यवस्थेची स्थिती, सामाजिक सलोखा, अंतर्गत कायदा व सुव्यवस्था आणि परराष्ट्र धोरण. गेल्या नऊ वर्षात या सर्व निकषावर केंद्र सरकार अपयशी ठरले आहे.
गेल्या अनेक दशकांपासून भारत बाह्य सुरक्षेचा सामना करत असताना आजही त्यात कोणतीच सुधारणा झालेली नाही. गेल्या तीन वर्षात चीनची घुसखोरी वाढली आहे. दुर्दैवाने चिनी घुसखोरीवर सरकारने बोलणे अपेक्षित असताना उलट सप्टेंबर २०२० मध्ये संसदेत या मुद्द्यावर बोलण्याची परवानगी दिली नाही.
राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली त्यावर सरकारने बोलण्याचे टाळले. चीनलगतच्या प्रत्यक्ष ताबा रेषेवर सध्या स्थिती कशी आहे, याबाबत केंद्र सरकारने माहिती द्यावी. यात किती बफर झोन तयार केले आहेत, पैकी भारतीय हद्दीत किती क्षेत्र मोडते आणि कोणते आहेत यावर तत्काळ श्वेतपत्रिका काढावी. चीन सीमेलगत क्षेत्रातील अनेक भाग आपण गमावला आहे, असा दावा तिवारी यांनी केला.
परराष्ट्रमंत्र्यांवर आरोपांच्या फैरी
भारताच्या परराष्ट्र धोरणावरून तिवारी यांनी परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. ते म्हणाले, भारताला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत कायम सदस्यत्व मिळण्याबाबत गेल्या नऊ वर्षात काहीच हालचाल झाली नाही. भारताला अद्याप अणू पुरवठादार गटाचे सदस्यत्व का मिळाले नाही?
२०१५ पासून आतापर्यंत सार्क शिखर परिषद का झाली नाही? भारताच्या शेजारी देशात चीनचा वाढता हस्तक्षेप कमी करण्यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहे? रशिया आणि चीनचा मुकाबला करण्यासाठी भारताकडे रणनीती आहे का? अशी विचारणा तिवारी यांनी केली.
देशार्तंगत सुरक्षा व्यवस्थेबाबत बोलताना मणिपूरमधील हिंसाचाराचा संदर्भ घेत ते म्हणाले, की इतक्या दिवसांनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना या राज्याला भेट देण्याची गरज वाटली. जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यास सरकार का घाबरत आहे? असाही सवाल केला.
देशातील आर्थिक स्थितीबाबत ते म्हणाले की, महागाई ही घरगुती बजेटसाठी सर्वात मोठी समस्या आहे. इंधनाच्या भडकलेल्या किमती आणि श्रीमंत व गरीब यांच्यातील वाढती दरी यावर तिवारी यांनी प्रकाश टाकला. केंद्रातील भाजपचे सरकार रोजगार निर्मितीत अपयशी ठरल्याचाही त्यांनी यावेळी आरोप केला.
राहुल गांधी यांच्याकडून ‘ट्रकयात्रे’चे व्हिडिओ शेअर
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतीच ट्रकचालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दिल्ली ते चंडीगड महामार्गावरून ट्रकयात्रा केली होती. या रात्रभरच्या प्रवासाचे तसेच ट्रकचालकांशी साधलेल्या संवादाचा व्हिडिओ गांधी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
या ३५ सेकंदांच्या व्हिडिओत राहुल गांधी ट्रकमध्ये बसून चालकाबरोबर प्रवास करताना दिसतात. त्याचप्रमाणे ते ढाब्यावर ट्रकचालकांशी संवाद साधतानाही दिसतात. गांधी यांनी आपल्या हिंदीतून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की दिल्ली ते चंडीगडदरम्यान सहा तासांच्या प्रवासात ट्रकचालकांशी छान संवाद झाला. रस्त्यावरच दिवसाचे २४ तास घालवणारे ट्रकचालक देशाच्या कानाकोपऱ्याला जोडतात. राहुल गांधी यांनी या संपूर्ण व्हिडिओची लिंकही आपल्या युट्यूब पेजवर शेअर केली आहे.
राहुल गांधी यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र.४४ वर मुरथाल येथील ढाब्यात ट्रकचालकांची भेट घेत त्यांच्यांशी संवाद साधला होता.