पक्षविरोधी कारवाया करू नका; शिवकुमार यांचा बंडखोरांना इशारा

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जुलै 2019

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे सचेतक गणेश हुक्केरी यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या सर्व आमदारांना व्हीप जारी केला. विधिमंडळ कामकाजात भाग घेऊन मतदानावेळी पक्षाच्या बाजूने मतदान करण्यास व्हीपमध्ये बजावण्यात आले आहे.

बंगळूर : ''न्यायालयाने सभाध्यक्षांचा अधिकार उचलून धरला आहे. एक आमदार म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे मी स्वागत करतो. आमदारांनी अधिवेशनाच्या कामकाजात भाग घ्यायचा किंवा नाही हा त्यांचा निर्णय आहे. बंडखोर आमदारांनी याची जाणीव ठेवावी व अपात्रतेच्या अस्त्राचे बळी पडू नये. तसेच कुणाचे तरी ऐकून पक्षविरोधी कारवाया करू नका. तुम्हाला ज्या मतदारांनी निवडून दिले, त्यांच्या भावनेची कदर करा,'' असे आवाहन पाटबंधारे मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांनी केले.

अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होण्याबाबत त्यांना ते स्वातंत्र्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे; परंतु पक्षाच्या हातात व्हीपचे अस्त्र आहे. अपात्रतेचा दुसराही कायदा आहे. आमच्या पक्षाच्या आमदारांना मी बंडखोर संबोधणार नाही. त्यांना आमचे मित्र म्हणूनच मी ओळखतो, असेही शिवकुमार यांनी स्पष्ट केले.  

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामलिंगा रेड्डी यांनी आपण काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचे सांगून राजीनामा मागे घेणार असल्याचे संकेत पत्रकारांशी बोलताना दिले. आपण काँग्रेस पक्ष किंवा मुख्यमंत्र्यांविरुद्ध कधीच वक्तव्य केले नसल्याचे ते म्हणाले. उद्या (ता.18) सभागृहाच्या कामकाजातही भाग घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे सचेतक गणेश हुक्केरी यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या सर्व आमदारांना व्हीप जारी केला. विधिमंडळ कामकाजात भाग घेऊन मतदानावेळी पक्षाच्या बाजूने मतदान करण्यास व्हीपमध्ये बजावण्यात आले आहे. न्यायालयाने राजीनामा दिलेल्या आमदारांना अधिवेशनात उपस्थित राहण्याची सक्ती नसल्याचे म्हटले असले तरी सभाध्यक्षांच्या परवानगीशिवाय अधिवेशनास गैरहजर राहता येत नाही, व्हीपचे उल्लंघन केल्यास आमदारांवर कारवाई होऊ शकते, असा काँग्रेसचा दावा आहे.

तसेच मुख्यमंत्री कुमारस्वामी गुरूवारी (ता.18) विश्वासदर्शक ठराव सादर करणार आहेत. यासाठी भाजपने आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांना आज (बुधवार) व्हीप जारी केला. विरोधी पक्षाचे विधानसभेतील सचेतक सुनीलकुमार यांनी पक्षाच्या सर्व 105 सदस्यांना व्हीप जारी केला आहे. मुख्यमंत्र्याच्या विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर व्हीप जारी करण्यात आला आहे. रिव्हर्स ऑपर्शन होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. कॉंग्रेस व धजदने यापूर्वीच आपल्या पक्षाच्या आमदारांना व्हीप जारी केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sivakumar warning to the rebels