कार-ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 जानेवारी 2019

राष्ट्रीय महामार्गावर स्तवनिधी घाटाजवळ हॉटेल अमरनजीक शनिवारी (ता. 5) दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा ठार झाल्याची घटना घडली आहे. मोटार (एम.एच. 09 टी.एन. 157) व फरशी वाहून नेणारा ट्रक (टी.एन. 52 एच. 8884) यांच्यात भीषण अपघात झाला.

निपाणी - पुणे-बंगळूर महामार्गावरील निपाणीजवळील स्तवनिधी (तवंदी) घाटात शनिवारी (ता. ५) ट्रक व मोटार यांच्यातील भीषण अपघातात मुरगूड (ता. कागल) येथील एकाच कुटुंबातील सहा जण जागीच ठार झाले. ट्रकचालकाचा उपचार सुरू असताना रात्री उशिरा मृत्यू झाला. भरधाव ट्रकने बेळगावकडे जाणाऱ्या मोटारीला दुभाजक तोडून धडक दिली. मोटारीतील सहा जणांचा अंत झाला.

दिलावरखान बापूसाहेब जमादार (वय ६५), त्यांची पत्नी रेहाना, मोठा मुलगा डॉ. मोहसीनखान जमादार (३४), सून आफरीन व आयान (५, सर्व रा. मुरगूड) आणि धाकटा मुलगा जुनैदखान दिलावरखान जमादार (२८) अशी मृतांची नावे आहेत. जुनैदखान यांच्या मुलाचे बारसे रविवारी (ता. ६) होते. त्यासाठी सारे कुटुंबीय बेळगावला निघाले होते. जुनैदखान यांच्या पत्नी बाळासह बेळगाव (माहेरी) येथे आहेत. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, ट्रकचालक व्हैय्यापुरी (४५, रा. पंडरुट्टी, ता. पंडुट्टी. जि. कडलूर-तमिळनाडू) याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. क्‍लीनर मोहन राजवेल (३१, रा. पंडरुट्टी, ता. पंडुट्टी. जि. कडलूर-तमिळनाडू) जखमी आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ः शनिवारी (ता. ५) ट्रक (टीएन ५२ एच ८८८४) बंगळूरहून पुण्याच्या दिशेने फरशी घेऊन जात होता. तवंदी घाटातील हॉटेल अमरजवळील वळणावर भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. महामार्गावर दुभाजक तोडून ट्रकने मुरगूडहून बेळगावकडे जाणाऱ्या मोटारीला (एमएच ०९ टीएन १५७) फरफटत नेले. ट्रकची धडक एवढी जोरात होती, की त्यात मोटारीसह ट्रकच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. ट्रकची पुढील दोन्ही चाके व पुढचा भाग निखळून पडला होता.

 शिवाय मोटारीचेही तुकडे दोनशे फुटांवर जाऊन पडले.
ट्रकच्या धडकेत मोटारीतील सहाजण जागीच ठार झाले. सर्व मृतदेह मोटारीत अडकून पडले होते. घटनास्थळी हायवे पेट्रोलिंग कर्मचाऱ्यांसह शहर पोलिस तातडीने दाखल झाले. तासाभराच्या प्रयत्नानंतर सर्वांच्या मदतीने मृतदेहांचे अवशेष बाहेर काढण्यात आले. मृतदेहांचा चेंदामेंदा झाल्याने ते छिन्न-विच्छिन्न अवस्थेत होते. यामुळे त्यांची नेमकी ओळख पटण्यास विलंब झाला. अखेर आफरीन जमादार यांचे ओळखपत्र मिळाल्यावर ते मुरगूड येथील कुटुंबीय असल्याचे स्पष्ट झाले.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दिलावरखान यांचे चुलत बंधू व मुरगूड नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेखान जमादार, उपनगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, नगरसेवक व नातेवाईक दाखल झाले. घटनास्थळी मृतदेह पाहून नगराध्यक्ष जमादार यांच्यासह सर्वांनाच धक्का बसला. जखमी ट्रकचालक व क्‍लीनरला उपचारासाठी महात्मा गांधी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथून चालकाला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना रात्री त्याचा मृत्यू झाला.

घटनास्थळी जिल्हा पोलिस प्रमुख सुधीरकुमार रेड्डी यांनी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी मंडल पोलिस निरीक्षक संतोष सत्यनाईक, पोलिस उपनिरीक्षक एच. डी. मुल्ला यांनी त्यांना माहिती दिली.

‘मी चाललोय, अण्णांना माझा नमस्कार सांगा...’
मुरगूड : रोज सकाळी शहरातील गावभागात असणाऱ्या जमादार चौकात येऊन जाणारे दिलावरखान जमादार आज सकाळीही चौकात आले आणि तेथील राजू परीट यांना भेटले व बोलून गेले, की ‘अण्णांना माझा नमस्कार सांगा...’ आणि हेच वाक्‍य त्यांचे चौकातील अखेरचे ठरले. दिलावरखान मुरगूडमधील एक उत्कृष्ट व्हॉलीबॉलपटू आणि हौशी गायक म्हणून प्रसिद्ध होते. ते चार वर्षांपूर्वी कागलच्या छत्रपती शाहू साखर कारखान्यातून निवृत्त झाले. सकाळी बेळगावला जाण्यापूर्वी त्यांनी नेहमीप्रमाणे जमादार चौकात चक्कर मारली. मित्रमंडळींची भेट घेतली आणि आपण सर्वजण बेळगावला बारशाच्या कार्यक्रमाला जाणार असल्याचे सांगून घरी जात होते. याच दरम्यान त्यांनी चौकातील राजू परीट यांची भेट घेतली आणि ‘अण्णा कोठे दिसत नाहीत? मी चाललोय, अण्णांना माझा नमस्कार सांगा...’ असे सांगून ते तेथून निघून गेले. त्यांचे हे वाक्‍य नियतीने अखेरचे ठरविले. आज दिलावरखान जमादार आणि त्यांच्या कुटुंबास झालेला भीषण अपघात समजताच जमादार चौक त्यांच्या अखेरच्या भेटीने आणि ‘मी चाललोय, अण्णांना माझा नमस्कार सांगा’ या आठवणीने हळहळून गेला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six Peoples Killed in a family in a Accident Near Nipani