आत्मघाती हल्ल्यात सहा पोलिस हुतात्मा

वृत्तसंस्था
सोमवार, 21 मे 2018

दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात छत्तीसगडमध्ये सहा पोलिस हुतात्मा झाले, तर दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. नक्षलवाद्यांनी पोलिसांची गाडी अत्याधुनिक स्फोटकांनी (आयईडी) उडवून लावली. 

रायपूर (छत्तीसगड) : दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात छत्तीसगडमध्ये सहा पोलिस हुतात्मा झाले, तर दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. नक्षलवाद्यांनी पोलिसांची गाडी अत्याधुनिक स्फोटकांनी (आयईडी) उडवून लावली. 

दंतेवाडामधील चोलनार आणि किरंदुल या गावादरम्यान रस्ता बांधणीचे काम सुरू असून या कामाचे साहित्य वाहून नेणाऱ्या गाडीला छत्तीसगड सशस्त्र दल आणि जिल्हा पोलिस दलाचे संयुक्त पथक संरक्षण देत होते. हे पथक एका मोटारीतून जात होते. या वेळी झुडूपांमध्ये लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेल्या आयईडीचा स्फोट घडवून आणला. हा स्फोट इतका शक्‍तिशाली होता की यामुळे दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आणि रस्त्यावरही दहा फूट लांबीचा खड्डा पडला. या हल्ल्यात पाच पोलिसांचा जागीच मृत्यू झाला, तर एका जणाला रुग्णालयात नेले जात असताना हौतात्म्य आले. रामकुमार यादव, टिकेश्‍वर धुरव, शाळीग्राम, विक्रम यादव, राजेश सिंह आणि वीरेंद्र नाथ अशी हौतात्म्य आलेल्या पोलिसांची नावे आहेत. हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी पोलिसांकडील शस्त्रे पळवून नेली. या घटनेनंतर पोलिसांनी मोठी शोधमोहीम सुरू केली आहे. 

Web Title: six police Killed In Landmine Blast