उत्तर प्रदेश, राजस्थानात धुळीच्या वादळाने 63 जण दगावले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

या वादळात जीव गमावलेल्या लोकांच्या संख्येत अजुन वाढ होऊ शकते अशी भीती येथील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश आणि राजस्थानात धुळीच्या वादळाने 63 लोक दगावल्याची नोंद झाली आहे. पुर्व राजस्थानात प्रचंड धुळीचा सामना लोकांना करावा लागत आहे. येथील अलवर, ढोलपूर आणि भरतपूर जिल्ह्यांमध्ये हे वादळ धडकल्याने येथे वीजप्रवाह खंडीत झाला आहे. झाडे आणि घरे पडत आहेत. या वादळात जीव गमावलेल्या लोकांच्या संख्येत अजुन वाढ होऊ शकते अशी भीती येथील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे सगळ्यात जास्त जीवित हानी झाली आहे. 36 लोकांना या वादळाने जीव गमवावा लागला आहे. या राज्यातील बिजनौर, सहारनपुर आणि बरेली येथील 9 लोकांचे बळी गेले आहेत. आग्राचे अतिरिक्त जिल्हाधिकारी राकेश मालपनी म्हणाले की, वादळग्रस्त भागात बळी पडलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपये दिले जाणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांकडे मदतकार्य हाताळण्याचे आणि प्रभावित झालेल्यांना वैद्यकीय सहाय्य देण्याचे आदेश दिले. त्यांनी अधिकाऱ्यांना मदतकार्याबाबतीत कसलीही कसर राहता कामा नये, असे बजावले आहे. 

राजस्थानातील मृतांचा आकडा वाढला असून तो 27 वर पोहोचला आहे. 100 पेक्षा अधिक लोक धुळीच्या वादळाने गंभीर जखमी झाले आहे. अलवर हा जिल्हा दिल्लीहून 164 किमी अंतरावर आहे. या जिल्ह्यातील वीज काल रात्रीपासून पुर्णपणे बंद झाली आहे. भरतपूर जिल्ह्यात 11 लोकांचे बळी गेले आहेत, अशी नोंद आहे. 

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी नुकसान झालेल्या क्षेत्रांविषयी मदतीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती मागवली आहे. वसुंधरा राजे यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, 'वादळामुळे अलवर, भरतपूर आणि ढोलपूर येथील संकटग्रस्तांना आणि सर्व जखमी व्यक्तींवर उपचार करण्याच्या प्रत्येक संभाव्य मदतीची खात्री करण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाला सांगितले आहे. ज्यांनी आपले जीवन गमावले आहे त्यांच्या कुटुंबीयांबद्दल माझी सांत्वना आहे.' 
 

वादळाने आणि पावसाने बुधवारी दिल्लीलाही झोडपले. बुधवारी राजस्थानातील कोटा येथे 45.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. हवामान खात्याने राज्यातील विविध भागात धुळीचे वादळ, उष्णतेची लाट आणि काहीशा पावसाची चेतावणी दिली होती.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

   

Web Title: Sixty Three People Dead After Powerful Dust Storm Hits Uttar Pradesh Rajasthan